स्वतःला कॅप्टन म्हणविणाऱ्या अशोक ज्योतिष्याचे काळे कारनामे सध्या चर्चेत आहेत. राजकारण आणि ज्योतिष्य यांच्यातले नटे आता काही गुपित राहिले नाही. कोणी कितीही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आव आणला तरी अगदी उमेदवारी अर्ज भरायला देखील मुहूर्त पाहूनच जाणारी संख्या फार मोठी आहे. कर्तृत्वाला कोठेतरी नशिबाची जोड पाहिजे ही मुळातच प्रथमपासून मनात घर करून बसलेली भावना आणि मग ती जोड मिळविण्यासाठी कुठल्या तरी मंत्र तंत्राच्या साह्याने 'काहीही ' करण्याची सुरु असलेली स्पर्धा यातून अशा भोंदू बाबांचे फावत असते. अशोक खरात हे काही देशातले एकमव प्रकरण नाही, राजकारणाचा आधार घेऊन हवा तो उच्चद मांडणारे असले कथित बाबा यापूर्वी देखील खूप झालेले आहेतच, 'बुवा तेथे बाया ' हा संतांनी दिलेला इशारा विसरून नशिबाचा शोध घेण्यापेक्षा नशीब बदलण्याची इच्छा मनात असलेला समाज जोपर्यंत आहे , तोपर्यंत बाली पडणारांचे आणि फसवणारांचे चेहरे नवे बदलतील , पण ही समाजविघातक भोंदूगिरी थांबणार नाही.
स्वतःला कॅप्टन म्हणविणाऱ्या आणि अनेक राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणाऱ्या , कायम राजकीय वर्तुळात वावरणाऱ्या अशोक खरातचे कारनामे समोर आल्यानंतर खेरेटर महाराष्ट्रीय समाजमनाला लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. यात त्या खरात सोबत कोणाकोणाचे फोटो आहेत, किंवा त्याची भक्तमंडळी कोण कोण होती, त्याला कोंबाची पाठराखण होती हे समोर येत आहेच. यातील किती लोकांना कशा प्रकारचे 'आशीर्वाद' या खरात कडून मिळाले होते हे देखील यथावकाश समोर येईलच, मात्र या साऱ्या प्रकारातून दुसरे जे एक जळजळीत वास्तव समोर आले आहे, ते म्हणजे आपण ज्यांच्याकडे नेते म्हणून पाहतो, ज्यांनी समाजाला दिशा द्यायची असते ते लोक किती 'भोंदू भोळे ' झाले आहेत तो आहे, आणि तो फार गंभीर आहे. खरात काय किंवा चाकणकर आणि तत्सम नेते काय, हे चेहरे आहेत, मूळ प्रश्न आहे तो 'भोंदू भोळ्या ' मानसिकतेचा. असेही खंगरात सारखे अनेक जण वेगवेडगल्या काळात समोर आले होतेच आणि त्यांना सत्तेचा आधार मिळाला होताच. राजकारणाला 'तांत्रिकता ' यापूर्वी देखील खुणावत राहिली आहेच. मग कधी हा चेहरा चंद्रास्वामीचा असतो तर कधी अशोक खरातचा. आणि यात अडकणारे देखील नेहमीच उच्चपदस्थ असतात.
राजकारण आणि एकूणच साऱ्याच क्षेत्रात कमालीची अस्थिरता आलेली आहे. आणि मग त्या अस्थिरतेतूनच स्थिरता शोधण्यासाठी अशा अघोरी मानसिकतेकडे आकृष्ठ होण्याची जी विकृती सध्या वाढत आहे हा फार गंभीर विषय आहे. या साऱ्या प्रकरणावर भाष्य करताना मंत्री छगन भुजबळ यांनी 'राजकीय सामाजिक जीवनातील व्यक्तींनी कोठे थांबावे हे लक्षात घेतले पाहिजे ' असे सांगितले , मात्र आजही प्रत्येक गोष्ट कोट्या तरी गुरूच्या सांगण्यावरूनच करणारी मानसिकता दिवसेंदिवस वाढत आहे. मुळात या समाजाला स्वतःच्या संस्कृतीचा विसर पडला आहे. मंत्र , तंत्र, जारण , मारण , वशीकरण हे सारे प्रकार अनादी काळापासून चालत आलेले आहेतच , मात्र त्याला आपल्या समाजव्यवस्थेने कधीच उजळमाथ्याने मान्यता दिलेली नाही. उलट हे सारे 'काळे कृत्य ' किंवा काळी जादू , काळी विद्या असेच समाज ठरवत आला आहे. अध्यमाच्या म्हणा किंवा धार्मिकतेच्या म्हणा, मूळ प्रवाहात कधी असल्या उपायांना स्थान मिळालेले नाही, तरीही झटपट काहीतरी मिळविण्याच्या आणि कथित नियतीला बदलण्याच्या अट्टाहासापायी असल्या बाबा बुवांचे कायम आले आहे आणि तेच समाजासाठी जास्त घातक आहे. अगदी आपल्या वारकरी संप्रदायाने असल्या बुवाबाजीच्या विरोधात कठोर टीका केलेली आहे, पण समाज म्हणून एकूणच या साऱ्या शिकवण्याचा विसर पडू लागला की काय होते याचे उदाहरण म्हणून आता खरात प्रकरणाकडे पाहायला हवे. यातील ज्या महिलांचे लैंगिक शोषण झाले, त्यांनी समोर येऊन तक्रारी द्याव्यात, कोणी यापूर्वी असे गुन्हे दडपण्याचा प्रयत्न केला असेल तर ते राजकारणी असोत व प्रशासनातील अधिकारी, त्यांच्यावर देखील कठोरातली कठोर कारवाई व्हावीच, पण यापलीकडे जाऊन असल्या भोंदू विकृतीला बाली पडणाऱ्या समाजमनाची मशागत कशी करायची ? ज्या राजकारण्यांनी समाजाला दिशा द्यायची तेच असल्या विकृतीला बळी पडणार असतील तर मग समाजाला रस्ता दाखवायचा कोणी? या साऱ्या प्रकरणावरचे राजकारण काय व्हायचे ते होईल , यातून आणखी कोणकोण सामाजिक दृष्ट्या नागडे होणार आहे ते येत्या काळात समोर येईलच , पण एकूणच आपल्या सामाजिक मानसिकतेचे जे नागडेपण यातून समोर आले आहे त्याचे काय ?

प्रजापत्र | Monday, 23/03/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
