बीड दि.१३ (प्रतिनिधी): आखाती देशातील युध्दाचा परिणाम सर्वत्र जाणवू लागला आहे. पेट्रोल, डिझेलसह घरगुती, व्यवसायिक गॅसच्या वितरणावर परिणाम झाला आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आज शहरातील बहुतांश गॅस एजन्सींच्या बाहेर ग्राहकांनी उन्हात लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. खरं तर जिल्हा प्रशासनाने यापुर्वी आवाहन केलेले आहे की, गॅससह पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा आपल्याकडे आहे.
पुढील दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी पुरेल एवढा साठा असतांना विनाकारण नागरीक अफवांवर विश्वास ठेवून गॅस सिलेंडर घेण्यासाठी रांगा लावू लागले आहेत. एरव्ही जिल्ह्यासाठी साधारण सात ते आठ हजार गॅस टाक्यांची मागणी नोंदवली जाते. त्या तुलनेत पुरवठा देखील केला जातो. मात्र दिवसभरात तब्बल १७ हजार गॅस सिलेंडर टाक्यांची ऑनलाईन मागणी नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सहाजिकच वरिष्ठ यंत्रणेवर, एजन्सीवर ताण पडत आहे. ज्यांना गरज नाही ते सुध्दा आपला गॅस कधी तरी संपेल ? पुन्हा मिळणार नाही म्हणून ऑनलाईन मागणी नोंदवू लागले आहेत. त्यामुळेच मागणीचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक पाहता जिल्ह्यात इंधन टंचाई सारखी परिस्थिती नाही. त्यामुळे नागरीकांना उन्हात उगीच गर्दी करू नये, अफवांवर विश्वास ठेऊ नये, आवश्यक असेल तर गॅस सिलेंडरची मागणी नोंदवा असे आवाहन करण्यात येत आहे.

