Advertisement

दारूच्या तर्रर्र नशेत घेतली एसपींची भेट अन......

प्रजापत्र | Tuesday, 24/02/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.२४ (प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या निवासस्थानाचे काम सुरु असताना एका पोलीस कर्मचाऱ्याला गांजा ओढताना एसपींनी रंगेहात पकडल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.यात दोषी कर्मचाऱ्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्या कर्मचाऱ्याला निलंबित केले होते.आता अशीच एक घटना घडली आहे.थेट पोलीस अधिक्षक यांच्या कॅबिनमध्येच दारूच्या तर्रर्र नशेत गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश नवनीत कॉवत यांनी दिले.सदर कर्मचाऱ्याची अल्कोल तपासणी पॉझिटिव्ह आल्यावर त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे कळते.  
      मिळालेल्या माहितीनुसार एका कर्मचाऱ्याला लातूर येथे ट्रेनिंगसाठी पाठविण्यात आले होते.मात्र तो त्या ठिकाणी गेला नाही.बीडमध्येही कर्तव्यावर रुजू झाला नाही.काही दिवसांच्या विश्रांतीनंतर तो कामावर रुजू होण्यासाठी गेल्यानंतर एसपींना आधी भेटा असे सांगण्यात आले.मात्र थेट एसपीं पुढे जाण्याची हिंमत होत नसल्याने असेल कदाचित त्यामुळे त्या कर्मचाऱ्याने दारू ढोसली.दारूच्या तर्रर्रर्र नशा झाल्यानंतर त्याने एसपींच्या कॅबिनमध्ये पाऊल ठेवले आणि आपले म्हणणे मांडणे सुरु केले.मात्र एसपींना संशय आल्याने त्यांनी थेट सदर कर्मचाऱ्याची अल्कोल तपासणीचे आदेश दिले.त्यानुसार जिल्हा रुग्णालयात तपासणी झाल्यानंतर यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे कळते.सध्या शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्या कर्मचाऱ्याला निलंबित देखील करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 
यापूर्वीही झाले होते निलंबन
एसपींच्या कॅबिनमध्ये दारूच्या तर्रर्र नशेत गेलेल्या कर्मचाऱ्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असली तरी ते कर्मचाऱ्याचे यापूर्वीही एकदा निलंबन झाल्याची माहिती आहे.तत्कालीन पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी वादग्रस्त असलेल्या या कर्मचाऱ्याला एकदा दणका दिला होता.आता पुन्हा एकदा नवनीत कॉवत हे त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करत असल्याचे संकेत आहेत.

Advertisement

Advertisement