बीड-आनंदीबाईंच्या 'ध' च्या 'मा' ने पेशवाईच्या इतिहासाला कलाटणी दिली होती. अगदी तशीच कलाटणी बीडच्या राजकारणालाही मिळाली, त्याला आता सुमारे १२ वर्ष होत आहेत. तब्बल एका तपानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी २००९ च्या निवडणुकीत 'ध' चा 'प' झाल्याचा सल बोलून दाखवला. काही राजकीय सल आयुष्यभर बोचत राहतात हेच धनंजय मुंडेंच्या भावनिक भाषणातून पुन्हा समोर आले.
धनंजय मुंडे हे राज्यातले एक फायरब्रँड नेतृत्व. ते बोलायला उभे राहिले म्हणजे लाहया फुटाव्यात तसे शब्द फुटत असतात. गोपीनाथ मुंडे- प्रमोद महाजनांच्या तालमीत तयार झालेली धनंजय मुंडेंची वक्तृत्वशैली अनेकदा भावूकही होते आणि मग धनंजय मुंडे मन मोकळं करीत राहतात.
शनिवारी स्वतःच्या जन्मगावात धनंजय मुंडे असेच भावूक झाले आणि त्यांनी तब्बल १२ वर्षापुर्वीचा सल बोलून दाखविला.
'आपण जिल्हा परिषदेचे सदस्य झालो, पण अध्यक्षपदाने कायम हुलकावणी दिली. त्यावेळी २००९ मध्ये आपल्यालाच विधानसभेची उमेदवारी मिळणार होती. पण रात्रीतून 'ध' चा 'प' झाला. तो कोणी केला? संघर्ष मला नवा नाही. आताही मी मंत्री झाल्यावर माझ्यावर आरोप केले गेले' याची खंत धनंजय मुंडेंनी बोलून दाखविली. आणि पेशवातील 'ध' च्या ' मा' नंतर मुंडेशाहीतील 'ध' चा 'प' ची चर्चा सुरु झाली आहे. आता हे सारे करणारे कोण याचीच चर्चा सुरु आहे.
बातमी शेअर करा