माजलगाव दि. ५ (प्रतिनिधी ) : राजकरणात जनतेने मोठ्या मानाने निवडून दिल्यानंतर सत्तेसाठी कसल्याही तडजोडीचे संधीसाधू राजकारण करणाऱ्या चाऊस कुटुंबाने आता नगरपालिकेत गुंडगिरी देखील दाखवायला सुरुवात केली आहे. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने पीटीआरसाठीच्या शुल्काची मागणी केल्याचा राग आल्याने मजळगावात नगराध्यक्षपटीने थेट नगरपालिका कर्मचाऱ्यालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत असतानाही उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही.
माजलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी आ. प्रकाश सोळंके यांच्या विरोधात जाऊन चाऊस कुटुंबाला भरभरून दिले. आ. सोळंके यांचा कडवा विरोध असतानाही माजलगावच्या नगराध्यक्षपदी शिफा बिलाल चाऊस या निवडून आल्या होत्या. तर त्यांचे सासरे सहाल चाऊस हे नगरसेवक म्हणून निवडून आले. नगरसेवक होताच सहाल हौस यांना उपाध्यक्ष होण्याची इच्छा झाली आणि त्यासाठी स्वतःच्या पक्षाला बाजूला ठेवून त्यांनी थेट आ. प्रकाश सोळंके यांच्या पक्षाशी हातमिळवणी केली. त्यातून त्यांचे संधीसाधू राजकारण समोर आले होते.
आता चाऊस यांच्या गुंडगिरीचा चेहरा माजलगावकरच नव्हे तर जिल्ह्याच्या समोर आला आहे. गुरुवारी (दि. ५) दुपारी अक्षय धारक हे नगरपालिका कर्मचारी पीटीआर विभागात काम करत असताना त्यांनी एका नागरिकाला पीटीआरचे शुल्क म्हणून शंभर रुपयांची पावती घ्यायला सांगितली मात्र कर्मचारी पावती घ्याल सांगतो याचा राग नगराध्यक्ष शिफा बिलाल चाऊस यांचे पती बिलाल चाऊस यांना आला आणि त्यांनी पालिका कार्यालयातच अक्षय धारक यांना प्रचंड मारहाण केली. भरदुपारी नगराध्यक्षांचा पती एका कर्मचाऱ्याला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून चाऊस कुटुंबाचा गुंडगिरीचा चेहरा आता सर्वांसमोर आला आहे. दरम्यान नगरपालिका कर्मचाऱ्यांनी या मारहाणीचा निषेध केला आहे.
सत्ता इतक्या लवकर डोक्यात गेली
माजलगावकरांनी नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सहाल चाऊस यांच्या कुटुंबाला मोठ्या अपेक्षेने मतदान केले होते. राष्ट्रवादी शप च्या नेत्यांच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने शहरात देखील अगदीच नवख्या असलेल्या शिफा बिलाल चाऊस यांना नगराध्यक्ष केले. नगरपालिकेतील मनमानी कारभाराचा इतिहास माहित असतानाही जेलमधून आल्यावर माणूस बदलला असेल असे समजून सहाल चाऊस यांना नगरसेवक केले. मात्र या कुटुंबाने फार लवकर माजलगावकरांचे पांग फेडायला सुरुवात केली आहे. उपाध्यक्षपदासाठी जनादेशाचा अवमान करत केलेली हातमिळवणी असेल किंवा आता नगराध्यक्षपतिचे पालिकेतील पराक्रम, चाऊस कुटुंबाच्या डोक्यात फार लवकर सत्तेची मस्ती गेल्यानेच चित्र शहरात आहे.

