Advertisement

चाऊस यांच्या संधीसाधू राजकारणाला जगतापांची सणसणीत चपराक

प्रजापत्र | Wednesday, 28/01/2026
बातमी शेअर करा

 माजलगाव दि. २७ (प्रतिनिधी ) ; नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात आ. प्रकाश सोळंकेंच्या विरोधात रडापडीपासून आगपाखडी पर्यंतचे सर्व कांगावे केल्यानंतर स्वतःच्या उपाध्यक्षपदासाठी पुन्हा त्याच आ. प्रत्यक्ष सोळंकेशी हात मिळवणी करण्याच्या सहाल चाऊस यांच्या संधीसाधू राजकारणाचा वचपा मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शप ) चे नेते मोहन जगताप यांनी काढला . राष्ट्रवादी (शप ) च्या गटनेत्यांसह पाच नगरसेवकांनी विषय समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने सहाल चाऊस यांना तोंडघशी पडावे लागले तर पीठासीन अधिकाऱ्यांना समितीच्या निवडी पुढे ढकलावा लागल्या. दरम्यान 'चाऊस यांच्या गद्दारीच्या  राजकारणाला ही चपराक' असल्याची प्रतिक्रिया मोहन जगताप यांनी व्यक्त केली.
       माजलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शप ) च्या वतीने सहाल चाऊस यांच्या कुटुंबात नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली होती. यासाठी मोहन जगताप यांनीच पुढाकार घेतला होता. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसोबतच सहाल चाऊस यांच्या कुटुंबात त्यांना स्वतःला आणि त्यांच्या भावाला देखील नगरसेवक पदासाठी उमेदवारी देण्यात आली होती. यात नगराध्यक्षपदासाठी चाऊस यांच्या सून तर नगरसेवक पदासाठी सहाल चाऊस विजयी झाले होते. त्यांचे बंधू तालेब यांचा मात्र पराभव झाला होता.
संपूर्ण नगरपालिका निवडणुकीत अगदी उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळेपासून चाऊस आणि माजलगावचे आ. प्रकाश सोळंके यांच्यात टोकाचे मतभेद झाले होते. संपूर्ण प्रचारात चाऊस यांनी आ. सोळंके यांच्याविरुद्ध रडापडी सुरूच ठेवली होती, तसेच नगराध्यक्षपदाच्या विरोधी उमेदवाराऐवजी केवळ आणि केवळ आ. प्रकाश सोळंके यांच्यावरच टीका केली होती. मात्र निवडणुकीअनचे निकाल लागल्यानंतर स्वतःला उपाध्यक्ष होण्यासाठी त्यांनी थेट आ. प्रकाश सोळंके यांच्या नगरसेवकांची साथ घेण्याची भूमिका घेऊन स्वतःच्या पक्षाला देखील अडचणीत आणले होते. उपाध्यक्ष पदासाठी सहाल चाऊस यांनी आ. सोळंके यांच्याशी गळाभेट घेतली, हा प्रकार राष्ट्रवादी (शप )चे नेते मोहन जगताप यांना मात्र आवडला नव्हता.
मंगळवारी विषय समिती सभापती निवडीच्या माध्यमातून त्यांनी सहाल चाऊस यांच्या या संधीसाधू राजकारणाला चपराक लगावली. विषय समितीवर नावे देण्यासाठी आजची वेळ असताना राष्ट्रवादी (शप ) गटाच्या गटनेत्यांसह ५ नगरसेवकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. गटनेत्यांनी नावांची शिफारस केल्याशिवाय समिती सदस्य निवडता येणार सँल्याची भूमिका पीठासीन अधिकाऱ्यांना घ्यावी लागली. परिणामी सहाल चाऊस यांना चांगलेच तोंडघशी पडावे लागले . चाऊस यांच्या संधीसाधू राजकारणाला जगताप गटाने मारलेल्या या सणसणीत छपराकीची चर्चा सध्या माजलगाव शहरात जोरात सुरु आहे. राष्ट्रवादी (शप ) गटाचे गटनेते इमरान आगा खान, शरद यादव, नीला इतापे , सुचिता होके , गंगाबाई भोसले यांनी मोहन जगताप यांच्या निर्देशांवरून निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

Advertisement

Advertisement