Advertisement

 बीडशी ऋणानुबंध असणारा नेता हरवला

प्रजापत्र | Wednesday, 28/01/2026
बातमी शेअर करा

बीड दि.२८(प्रतिनिधी): अजित पवार या नावाचे आणि बीडचे नाते खऱ्याअर्थाने शब्दांपलीकडेचे.तसे तर मुळात बीड जिल्हा हा कायम पवार कुटुंबासोबतच राहिला,त्यातही जेव्हापासून अजित पवार राजकारणात सक्रिय झाले तेव्हापासून बीड जिल्हा अजित पवारांच्या प्रेमात पडला तो कायमचा.तसे बीड जिल्ह्याशी अजित पवारांचे नातेसंबंध देखील होतेच.माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे पुत्र धैर्यशील सोळंके यांच्याशी अजित पवारांचे जवळचे नाते.पण नात्यापलीकडे जाऊन त्यांनी बीड जिल्ह्यात राजकीय नाते मोठ्याप्रमाणावर निर्माण केले आणि जिल्ह्याच्या विकासात देखील मोलाची भूमिका निभावली.
सोळंके,पंडित,आडसकर या कुटुंबांशी अजित पवारांचे असलेले ऋणानुबंध तसे जुनेच,मात्र २०१२ मध्ये धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेले त्यात अजित पवारांचा पुढाकार महत्वाचा होता.तेव्हापासून धनंजय मुंडेंना अजित पवार पाठबळ देत आले आणि धनंजय मुंडेंनी देखील अजित पवारांची साथ दिली.ज्यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केले आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांसमोर शरद पवार का अजित पवार असा प्रश्न निर्माण झाला, श्रद्धेय का परमश्रद्धेय अशी परिस्थिती निर्माण झाली,त्यावेळी बीड जिल्हा मोठ्याप्रमाणावर अजित पवारांच्या सोबत उभा राहिला.आ.धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडित आदी नेत्यांनी अजित पवारांची साथ दिली, हा या नेत्यांचा अजित पवारांसोबतचा ऋणानुबंध होता.कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता अशी ओळख असल्याने बीड जिल्ह्यातील राजेश्वर चव्हाणांसारख्या नेत्याला थेट अजित पवारांच्या कानावर खूप काही घालता यायचे.
बीड नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अजित पवारांनी बीडकरांना शब्द टाकला.अजित पवारांच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडने अजित पवारांचा मान ठेवला नाही, मात्र बीडने अजित पवारांना साथ दिली. स्पष्टवक्तेपणा हा गुण घेऊन चालणारे अजित पवार कार्यकर्त्यांना,अधिकाऱ्यांना देखील फाटकारायचे, मात्र तरीही कार्यकर्ता कधी दुखावला गेला नाही.अजित पवार आणि कार्यकर्ता, अजित पवार आणि विकासकामे यांचे जणू एक वेगळे नाते या निमित्ताने जिल्ह्यात निर्माण झाले होते.हे ऋणानुबंध काही थोडक्या कालावधीचे नव्हते, तर मागच्या दोन तीन दशकांचे हे नाते होते.बीड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या योजनांना निधी देणारे अजित पवार, बीडच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारे अजित पवार, बीडमध्ये नवीनवी राजकीय समीकरणे रचणारे अजित पवार आणि सामान्यांना उभारी देणारे अजित पवार अशा अजित पवारांच्या अनेक आठवणी बीडकरांच्या मनात घर करून आहेत.

Advertisement

Advertisement