Advertisement

सारिका क्षीरसागर आक्रमक, सजग विरोधीपक्षाच्या भूमिकेत

प्रजापत्र | Thursday, 22/01/2026
बातमी शेअर करा

बीड दि. २१ (प्रतिनिधी ) ; बीड नगरपालिकेत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला तरी सभागृहातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजप समोर आलेला आहे. त्याच जोरावर आतापर्यंत सत्तेच्या वर्तुळात वावरत असलेल्या डॉ. सारिका क्षीरसागर मात्र आता बीड शहरात आक्रमक आणि सजग विरोधीपक्षाची भूमिका निभावताना दिसत आहेत.  
     बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळी भाजप संपूर्ण शक्तीनिशी उतरला होता. निवडणुकीच्या काही दिवस अगोदरच डॉ. योगेश क्षीरसागर आणि डॉ. सारिका क्षीरसागर या दाम्पत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि साहजिकच त्यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे आली. या निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी भाजपचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. बीड शहरात भाजपला आतापर्यंत मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. आता भाजपच्या गटनेत्या म्हणून डॉ. सारिका क्षीरसागर नगरपालिका सभागृहात आहेत.
डॉ. योगेश क्षीरसागर यांना सहकार्य करायचे म्हणून डॉ. सारिका क्षीरसागर राजकारणात सक्रिय झाल्या. २०२१  पर्यंत बीड नगरपालिकेत डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचीच सत्ता होती, तर त्या नंतर पालिकेवर प्रशासक होता. प्रशासकाच्या सुरुवातीचा काही काळ सोडला तर डॉ. योगेश क्षीरसागर सत्ताधारी पक्षातच होते. त्यामुळे तशी डॉ. योगेश क्षीरसागर किंवा डॉ. सारिका क्षीरसागर यांना विरोधी पक्षात वावरण्याची फारशी सवय नसल्यासारखीच आहे. मात्र आता बीड पालिकेत जनतेने विरोधात बसण्याचा जनादेश दिल्यानंतर जनतेने दिलेली 'ही ' जबाबदारी देखील डॉ. सारिका क्षीरसागर तितक्याच तडफेने निभावताना दिसत आहेत. शहरातील स्वच्छता आणि इतर प्रश्नांवरून रोज रस्त्यावर येत प्रशासनाला जाब विचारने असेल किंवा पालिकेच्या सभागृहात सत्ताधाऱ्यांना नियमांचा आरसा दाखविणे असेल , डॉ. सारिका क्षीरसागर यांच्यातील सजग आणि आक्रमक चेहऱ्याची चुणूक बीडकरांना पाहायला मिळत आहे. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर देखील अभ्यासपूर्ण आणि आक्रमक विरोध करत सत्ताधाऱ्यांवर आपण अंकुश ठेवू शकतो आणि जनतेची कामे मार्गी लावू शकतो हा विश्वास आपले कार्यकर्ते आणि सहकारी नगरसेवकांमध्ये निर्माण करण्याचा देखील त्यांचा हा प्रयत्न असेल, मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्यांना पालिकेतील मार्ग निव्वळच मोकळा राहणार नाही आणि भाजपच्या आक्रमक विरोधाला सामोरे जावे लागणार याचे स्पष्ट संकेत डॉ. सारिका क्षीरसागर यांनी दिले आहेत.

Advertisement

Advertisement