बीड दि. २१ (प्रतिनिधी ) : अजित पवारांच्या पालकी नजरेत असलेल्या बीड जिल्ह्यातील विवेकी प्रशासनाने जेम पोर्टलवर निविदा देऊन संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा , प्रोजेक्टर , युपीएस, बॅटरी , झेरॉक्स मशीन आदींच्या खरेदीसाठी कोट्यवधींच्या पुरवठा आदेशाला बुधवारी मंजुरी दिली. जेम पोर्टलवरील निविदेत आलेल्या कमीत कमी दराने हे खरेदी आदेश दिल्याचे सांगण्यात येत असले तरी याच वस्तूंची बाजारातील किंमत आणि टेंडरमधील किमान किंमत यात मोठ्याप्रमाणावर तफावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 'विवेकी ' प्रशासनाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह लागणार आहे.
बीड जिल्ह्यातील 'विवेकी ' प्रशासनाने बुधवारी नाशिक, पालघर आणि हिंगणघाट येथील तीन एजेंसींना वेगवेगळ्या वस्तूंचे खरेदी आदेश दिले आहेत. यासाठी जेम पोर्टलवरून निविदा मागविण्यात आल्या होत्या आणि त्यात किमान किंम्मत आलेल्या पुरवठादाराला हे आदेश दिल्याचे सांगण्यात येते. या किमती निविदेप्रमाणे किमान असल्यातरी प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा मात्र त्या कितीतरी अधिक आहेत.
१ लाख ४ हजाराला संगणक
तब्बल ९३ संगणक पुरवठ्यासाठी हुसेन ट्रेडर्स नाशिक यांना आदेश देण्यात आले आहेत. यात संबंधित पुरवठादाराला प्रतिसंगणक १ लाख ४ हजार ८५५ इतका दर मंजूर करण्यात आला आहे. ज्या तांत्रिक बाबींचा या संगणकात वापर असणार आहे त्याच तांत्रिक बाबींच्या संगणकासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारीच काढलेल्या शासन निर्णयात ६० हजार प्रति संगणक असा दर निश्चित केला आहे. तर बाजारात त्याच सांगकाची किंमत एक संगणक घेणाऱ्या ग्राहकाला ७० ते ८० हजार इतकी मिळते. विशेष म्हणजे सध्या बाजारात १३ जनरेशनचे आणि त्या पुढील संगणक उपलब्ध असताना १२ जनरेशनच्या संगणकाची मागणी नोंदविण्यात आली आहे.
३७ हजाराला बॅटरी
२०० एएच च्या ९६ बॅटरी खरेदीसाठी विदर्भ ग्रीन एनर्जी हिंगणघाट यांना पुरवठा आदेश देण्यात आले आहेत, यात एका बॅटरीची किंमत ३७ हजार ८८२ इतकी नोंदविण्यात आलेली असून या पुरवठा आदेशात कोणत्या कंपनीची बॅटरी पुरवायची याचा कसलाही उल्लेख नाही.विशेष म्हणजे आजच्या तारखेस बाजारात थेट ग्राहक एक बॅटरी विकत घ्यायला गेला तर याच बॅटरीसाठी अमरोन १४ हजार ८०० , पॉवर १३ हजार ८०० तर एक्साईड ही सर्वोत्तम मानली जाणारी बॅटरी २० हजारात सहज मिळते. मग प्रशासन ९६ बॅटरी खरेदी करणार असताना त्यात इतकी वाढ प्रशासनाच्या 'विवेकी ' नजरेतून सुटली कशी असेल ?
प्रोजेक्टर साठी दोन पुरवठादारांना वेगवेगळे दर
प्रोजेक्टर खरेदीसाठी दोन पुरवठादारांना आदेश देण्यात आले आहेत. यात न्यूरोटेक कम्प्युटर नाशिक यांच्याकडुन ७ प्रोजेक्टर प्रत्येकी ८६ हजार १४२ रुपयांना एक असा दर मंजूर करण्यात आला , तर त्याच तांत्रिक बाबी असलेल्या प्रोजेक्टरसाठी हुसेन ट्रेडर्स यांना १० प्रोजेक्टरचे प्रति प्रोजक्टर ९४ हजार ३२५ या दराने पुरवठा आदेश देण्यात आले आहेत.
झेरॉक्स , सीसीटीव्ही , युपीएस याचीही होणार खरेदी
२२ झेरॉक्स मशीन प्रत्येकी ३ लाख २७ हजार प्रमाणे विदर्भ ग्रीन एनर्जी यांच्याकडून खरेदी करण्यात येणार आहेत. ही कंपनी साधारणतः सौर ऊर्जा उपकरणांमध्ये काम करते असे कंपनीची वेबसाईट सांगते. १० कॅमेऱ्यांचा समावेश असलेल्या २२ सीसीटीव्ही कॅमेरा संचांसाठी न्यूरोटेक कॉम्पुटर नाशिक यांना साधारण प्रतिसंच २ लाख या दराने पुरवठा आदेश देण्यात आले आहेत. तर हुसेन ट्रेडर्स यांच्याकडून ५ केव्हीए चे इन्व्हर्टर २०० एएच च्या ५ बॅटऱ्यांसह खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी प्रति संच २ लाख १४ हजार रुपये देण्यात येणार आहेत. असे ५१ इन्व्हर्टर खरेदी करण्यात येणार आहेत.
निवडणूक खर्च घोटाळ्याची आठवण
केवळ निविदांमध्ये भरलेल्या कमीत कमी दरांवरून पुरवठा आदेश देण्यात येत असल्याचे सांगत बीड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी निवडणूक खर्चाचा मोठा घोटाळा राज्यात चर्चेत आला होता. त्यात निविदाकारानी दिलेले कमीत कमी दर पाहून आदेश दिल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्याच बाबींची बाजारपेठेतील किंमत मात्र कमी होती. त्यात अनेक प्रकरणात देयके अदा झाली नव्हती, तरी या प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीला सामोरे जावे लागले होते . या प्रकरणाची आठवण आता या निमित्ताने ताजी होत आहे.
लोकप्रतिनिधी काही बोलणार का गप्पच राहणार ?
बीड जिल्ह्यातील विकास कामांच्या संदर्भाने नेहमीच बाहेर वाईट चर्चा केली जाते. येथे कंत्राटांमधील टक्केवारी, बोगस कामे याबद्दल बाहेरचे नेते येऊन टीका करतात. छोट्या छोट्या विषयातील चुकीच्या कामांमुळे बीड जिल्ह्याला लक्ष केले जाते. आता केवळ निविदेमध्ये आलेल्या कमीत कमी दरांच्या नावाखाली बाजारपेठेपेक्षा वाढीव दराने कोट्यवधींची खरेदी होणार असेल तर सत्तेतले आणि विरोधाची पक्षांचे लोकप्रतिनिधी प्रशासनाला काही जाब विचारणार का उगीच अजित पवारांना वाईट वाटेल म्हणून पुन्हा गप्पच बसणार हा प्रश्न सामान्यांना पडत आहे.

