बीड: बीड जिल्ह्यात (Beed) सध्या पक्षांतराचा धुराळा उठत असतानाच बीड मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे बीड विधानसभा अध्यक्ष घड्याळाऐवजी 'जनता विकास आघाडी'च्या निर्णयाला पोहचले असल्याची माहिती असून दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सुत्रे आता ' शिवछत्र' वरुन हलायला लागली आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी योगेश क्षीरसागरांशिवाय स्वतंत्र पॅनल टाकण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे बीड नगरपालीकेत जनता विकास, दोन राष्ट्रवादी आणि एमआयएम अशी चौरंगी लढत होईल असे चित्र आहे.
बीडमध्ये (Beed)अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे एकमेकांना टोचत असल्याने घड्याळाची टिक टिक एकमेकांसाठी किटकिट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर घडयाळाशिवाय लढणार आहेत. भाजपची साथ घेत जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आपली ताकत पक्षाला आणि विरोधकांनाही दाखविण्याची तयारी त्यांनी अंतीम केली असल्याची माहिती आहे. हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे.
दुसरीकडे या धक्क्यातून पक्षाला बाहेर काढण्यासाठी आता 'शिवछत्र' वर हालचाली वाढल्या आहेत. माजी आ. अमरसिंह पंडित यांनी आता पक्षाची सुत्रे हाती घेतली असून राष्ट्रवादी, शिवसेना अशी युती निवडणूकीच्या रिंगणात उतरवली जात आहे. यांच्यासोबत शिवसंग्राम देखील येईल अशा हालचाली सुरु आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आ. संदीप क्षीरसागर यांनी तर तयारी केली आहेच त्यांच्या राष्ट्रवादीचा स्वतंत्र पॅनल राहणार आहे. तर एमआयएम ने शेख शफीक यांच्या नेतृत्वाखाली बीड शहरात पतंग उडविण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता बीड नगरपालीकेसाठीची चुरस वाढली असून ही लढत चौरंगी होईल असे चित्र आहे.

