कडा दि.१० (वार्ताहार):बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. आष्टी तालुक्यातील भवानीनगर तांड्याजवळ एका बिबट्याने थेट रस्त्यावर ठाण मांडले आणि एका वाहनचालकाचा रस्ता अडवल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. बिबट्यांनी आपला अधिवास बदलून आता चक्क रस्त्यावर येऊन बिनधास्तपणे संचार सुरू केल्याने डोंगरपट्ट्यातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
आष्टी तालुक्यातील विविध गावांच्या डोंगरपट्यात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांचे वास्तव्य आहे. वर्षानुवर्षे त्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. वनविभाग 'ठिकाण बदलून वास्तव्य' असल्याचे सांगत असले तरी, जनजागृती पलीकडे ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी बावी येथील एका तरुण शेतकऱ्याचा बिबट्याने जीव घेतला होता. याशिवाय पाळीव श्वान, वासरं आणि शेळ्यांवरही हल्ले झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता तर थेट महामार्गावर वाहनांच्या समोर बिबट्या बिनधास्त फिरत असल्याने, रात्रीच्या वेळी प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.

