Advertisement

क्षीरसागर,धोंडे एकाच दिवशी करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश ?  

प्रजापत्र | Monday, 10/11/2025
बातमी शेअर करा

 बीड दि. ९ (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि माजी आ. भीमराव धोंडे हे एकाच दिवशी म्हणजे उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी उपमुख्यममंत्री अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ देखील फोडणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या , विशेषतः जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रवेशापामुळे जिल्ह्यात अजित पवारांची राष्ट्रवादी अधिकच भक्कम असे चित्र आहे. मात्र जयदत्त क्षीरसागर यांच्या गोटातून याला अद्याप अधिकृत दुजोरा  मिळालेला नाही.
बीड जिल्ह्यात मागच्या अनेक दिवसांपासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मात्र जयदत्त क्षीरसागर अद्याप याबद्दल मौन पाळून आहेत. जयदत्त क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजे दिवंगत खासदार काकूंच्या पुण्यसमरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात 'घड्याळाच्या काट्यांवर चालण्याचे ' संकेत दिले होते, मात्र त्यात नंतर पुन्हा काहीच प्रगती झाली नव्हती. आता जयदत्त क्षीरसागर यांच्य्या पक्षश्रेष्ठींसोबतच्या बैठकांना अंतिम स्वरूप आल्याची माहिती असून पक्षासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आता त्यांचा राष्ट्रवादीममध्ये प्रवेश निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी पक्षातील प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, आ. धनंजय मुंडे हे आग्रही होते. पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत देखील जयदत्त क्षीरसागर यांच्या बैठका  झाल्या असून त्यानंतरच हा निर्णय झाला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. उद्या (दि. ११ ) हा प्रवेश होईल असे सांगितले जात आहे.आष्टीचे माजी आ.भीममराव धोंडे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश अगोदरच निश्चित झाला होता. ते उद्याच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
जयदत्त क्षीरसागर यांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर साहजिकच बीड विधानसभा मतदारसंघासोबतच जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर देखील परिणाम होणार आहे. मात्र प्रवेशाच्या या वृत्ताला अद्याप जयदत्त क्षीरसागर यांच्या गोटातून कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

Advertisement

Advertisement