मुंबई : मतदार याद्यांमधील घोळांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने आज मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चात बाळासाहेब थोरात, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भाषणं झाली. शरद पवार यांनी भाषण करताना संयुक्त महाराष्ट्राच्या आठवणी जाग्या झाल्याचं म्हटलं आहे. तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही पुरावे देत आक्रमक भाषणं केली.
आजचा हा मोर्चा निघाला आहे, मला जुन्या गोष्टी आठवत आहेत. त्या काळात संयुक्त महाराष्ट्रासाठी मोर्चे निघत असत. काळा घोडा परिसरात एक प्रकारचा इतिहास निर्माण करणारे हे मोर्चे होते. आज तुम्ही सगळ्यांनी जी एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र आणि ती चळवळ याची आठवण आली असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.आपण स्वतःसाठी काहीही मागत नाही. आपण एवढंच म्हणतो आहोत की लोकशाहीत संविधानाने जो अधिकार आपल्याला दिला त्याचं जतन करण्याची वेळ आली आहे. निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभा निवडणुकीत जे काही झालं त्यामुळे सामान्य माणसाचा संसदीय लोकशाहीवर जो विश्वास होता त्याला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जातो आहे. या सगळ्याला तोंड द्यावं लागेल. राजकीय मतभेद असू शकतात. निवडणुकांमध्ये संघर्ष असू शकतात पण या सगळ्या गोष्टी विसरुन आपल्याला एक व्हावं लागेल. लोकशाहीचा जो अधिकार आहे तो आपल्याला जतन करावं लागेल. हाच दृष्टीकोन समोर ठेवून आपल्याला वाटचाल करावी लागेल.
काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केली. बनावट आधारकार्ड तयार करुन मिळतात अशा त्या तक्रारी होत्या. कलेक्टर म्हणाले सिद्ध करा, पुरावे दिले गेले. मात्र ज्यांनी आरोप केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. याचा अर्थ हे शासन या सगळ्याला समर्थन देतं आहे. आमच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. पण देशाची संसदीय लोकशाही ही टिकवायची असेल, मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला आणि मला एक व्हावं लागेल. आज व्यासपीठावर असलेले नेते याच भावनेतून एकत्र आले आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

