मुंबई दि.१(प्रतिनिधी ): मतदार याद्यांमधील घोळ आणि कथीत मतचोरी विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मुंबई महानगरीत निवडणूक आयोगाविरोधात ‘सत्याचा मोर्चा’ काढला. या मोर्चात राज्यभरातून हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडीला समर्थन करणार्या लोकांनी उपस्थिती दर्शविली. मुंबईच्या फॅशन स्ट्रीटवरून या मोर्चाला सुरुवात झाली असून ‘मतचोर गद्दी छोड’ या घोषणेने परिसर दणाणून गेला. मोर्चामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्यासह आदी नेते उपस्थित आहेत. हा मोर्चा मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या दिशेने कूच करत असून त्याठिकाणी या मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे.
सत्तेविरुद्ध सत्याचा मोर्चा महाविकास आघाडी व मनसेच्या वतीने आज मुंबई महानगरीतून काढण्यात आला. या मोर्चेकर्यांच्या चार मागण्या असून यामध्ये प्रामुख्याने मतदार याद्या अद्यावत करा, मतदार याद्यातील दुबार नावे काढा, मतदार याद्या अपडेट होईपर्यंत निवडणूक लांबवा, 7 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा, या मागण्यांसाठी हा मोर्चा होत आहे. आज दुपारी एक ते दीडच्या सुमारास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा फॅशन स्ट्रीट येथून निघाला. पुढे तो मेट्रो सिनेमा या परिसरात आला. आता या मोर्चाने मुंबई महापालिका मुख्यालयाकडे कूच केली आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोर स्ट्रीट उभारण्यात आला असून त्याठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह आदी नेत्यांचे या ठिकाणी भाषणे होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात हा मोर्चा असून सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात या मोर्चात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत आहे.

