बीड दि.३१ (प्रतिनिधी):-ज्यांच्या एका शब्दावर हजारोंनी शेतकरी कधी बीड,कधी मुंबई तर कधी दिल्लीपर्यंत पायी जायला तयार असायचे, त्यांनी कारखान्याचा भावनिक विषय काढून केलेल्या धरणे आंदोलनाच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.हजारोंचे मोर्चे काढणाऱ्या धोंडेच्या धरणे आंदोलनाला शेकड्यात मोजता येतील इतकेच कार्यकर्ते होते,त्यातही शेतकरी आणि ऊसउत्पादक किती आणि 'पोटाचा प्रश्न' म्हणून आलेले कर्मचारी किती हा संशोधनाचा विषय,एकवेळ ते देखील बाजूला ठेवू,मात्र जो शेतकरी धोंडे म्हणल्यावर काहीही करायचा त्या शेतकऱ्याचे ह्रदय आता धोंडे यांच्याबद्दल 'दगड' का झाले आहे याचे आत्मचिंतन भीमराव धोंडे यांनी करायला हवे.

आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी महेश सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी म्हणून शुक्रवारी धरणे आंदोलनाची हाक दिली होती.भीमराव धोंडे यांचा इतिहास पाहता या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने शेतकरी स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहतील असे वाटत होते,मात्र प्रत्यक्षात काही शे लोकांच्या उपस्थितीत या धरणे आंदोलनाची औपचारिकता उरकली गेली.जे आले होते,त्यात प्रत्यक्ष शेतकरी किती आणि कर्मचारी,राजकीय कार्यकर्ते किती हा तर वेगळाच विषय.आष्टीच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात भीमराव धोंडे या नावाची वेगळी ओळख होती.शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आलेल्या या व्यक्तिमत्वाने पुढे काँग्रेस,भाजप आणि अशा अनेक पलट्या मारत राजकारण केले हा भाग वेगळा,पण त्यांची शेतकऱ्यांवर मोठी पकड होती.भीमराव धोंडेंनी आपल्या आयुष्यात ३ मोठे मोर्चे काढले.आष्टी ते बीड,आष्टी ते मुंबई आणि आष्टी ते दिल्ली.या तिन्ही मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे या मोर्चांना लोक पायी आले होते. धोंडेंनी आवाज द्यायचा आणि शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने यायचे असा जणू शिरस्ता पडलेला होता,पण भीमराव धोंडे यांना या जनाधाराचे सोने करता आले नाही.त्यांना शेतकऱ्यांनी अनेकदा विधानसभेत पाठविले पण त्यांच्या डोळ्यादेखत या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या आयुष्याचे मातेरे होताना धोंडे 'दगडी' मानसिकतेतून पाहत राहिले हा कटू असला तरी वास्तव इतिहास आहे.आष्टीच्या शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून आज ज्या महेश,(पूर्वीच्या कडा,भीमराव धोंडे यांना स्वतःपासून ते कारखान्यापर्यंत सर्वांचीच नावे बदलण्याचा भारी हौस असावा) कारखान्यासाठी भीमराव धोंडे शेतकऱ्यांना जमवत आहेत,त्या कारखान्याने शेतकऱ्यांच्या आयुष्यात असे काय दिवे लावले? कितीतरी शेतकऱ्यांना कारखान्याकडे उसाचे पैसे सोडून द्यावे लागले.कामगार, कर्मचाऱ्यांना न्यायालयाचे खेटे घालून,आरआरसीच्या कारवाया मंजूर करून घेऊन देखील अद्याप आपले पगार मिळालेले नाहीत आणि या असल्या 'कर्तृत्वाचे' गोडवे गात आज भीमराव धोंडे कारखाना वाचविण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना बोलवत असतील तर शेतकरी त्यासाठी कसे येणार? म्हणूनच शुक्रवारी धोंडे यांनी अगदीच थोडक्या कार्यकर्त्यांमध्ये धरणे आंदोलन उरकून घेतले.मात्र एकेकाळी शेतकऱ्यांचा नेते असलेले धोंडे आता त्याच शेतकऱ्यांना आपल्या गळ्यातील 'धोंड' तर वाटत नाहीत ना? याचाही विचार भीमराव धोंडेना आज ना उद्या करावा लागणार आहे.
