दिल्ली : भारताचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) केंद्र सरकारला पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची त्यांचा उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली. सरकारकडून अधिसूचना निघाल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश भूषण गवई आपले पद सोडतील. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून पदाभार स्वीकारतील.
न्यायमूर्ती सूर्यकांत या पदावर ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहतील.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश गवई यांनी संबंधित पत्राची प्रत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनाही दिली. २३ ऑक्टोबर रोजी सरकारने सरन्यायाधीश गवई यांना पत्र लिहून शिफारस पत्र पाठविण्याची विनंती केली होती. निवृत्त होणारे सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस करण्यासाठी सरकारला पत्र लिहितात, ही आतापर्यंतची परंपरा आहे.

