Advertisement

 दिवाळीनंतर जयदत्त क्षीरसागरांचा राजकीय निर्णय! 

प्रजापत्र | Sunday, 19/10/2025
बातमी शेअर करा

 बीड दि. १९ (प्रतिनिधी ) : दिवंगत केशरकाकुंच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादनसभेत 'आता घड्याळाच्या काट्यावर चालायची सवय करावी लागेल ' असे राजकीय संकेत देणाऱ्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा राजकीय निर्णय दिवाळीनंतर होणार आहे. दिवाळीचे फटाके फुटल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांची राजकीय 'घडी ' बसणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
बीड जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घकाळ मध्यवर्ती भूमिका निभावलेल्या माजी ममंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय भूमिका मागच्या काही वर्षात स्पष्ट झालेल्या नाहीत . २०२०  पासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर कोणत्याच राजकीय पक्षात नाहीत. निवडणुकांच्या संदर्भाने त्यांनी त्या त्या वेळी भूमिका घेतल्या , मात्र ते कोणत्याच राजकीय पक्षात गेलेले नव्हते. कोणतीतरी एक निश्चित राजकीय भूमिका त्यांनी घ्यावी यासाठी त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते त्यांच्या संपर्कात राहिलेले आहेत. राज्यभरातील राजकीय परिस्थिती अस्थिर असतानाच्या कोणतीही राजकीय भूमिका नको अशीच भूमिका त्यांनी वेळोवेळी आपल्या समर्थकांना बोलून दाखविली होती.
मात्र मागच्या काही काळात जयदत्त क्षीरसागर एका निश्चित राजकीय निर्णयाला पोहचले असल्याचे सांगितले जाते. त्यांनी दिवंगत केशरकाकू यांच्या पुण्यतिथीच्या वेळीच 'घड्याळाच्या काट्यावर चालायची सवय ' करावी लागेल असे वक्तव्य केले होते. आता दिवाळीनंतर त्यांचा राजकीय पक्षात प्रवेश होणार आहे. 'घडी गेली की पिढी जाते' हे वाक्य माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय भाषणांमध्ये नेहमीच परवलीचे राहिलेले आहे, त्यामुळे आता आपल्या समर्थक राजकीय कार्यकर्त्यांची पिढी जाऊ नये म्हणून ते 'घडी' जाऊ देणार नाहीत असे सांगितले जात आहे. दिवाळी नंतर बीडमधील जाहीर कार्यक्रमात त्यांच्या पक्ष प्रवेशाचे फटाके फुटणार असल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

राजकीय समीकरणे बदलणार
बीड जिल्ह्यातील सारेच राजकारण सध्या प्रचंड अस्थिर आहे. महायुतीचा जिल्ह्याच्या राजकारणावर पगडा असला आणि त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका खट्वासिव्ही असली तरी या पक्षात सध्या मोठ्याप्रमाणावर गटबाजी झालेली आहे. आ. प्रकाश सोळंके आणि माजी आ. अमरसिंह पंडित एका बाजूला तर माजी मंत्री धनंजय मुंडे समर्थक दुसऱ्याबाजूला असे चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत माजी ममंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ठोस राजकीय भूमिका घेतली तर त्याचे राजकीय परिणाम दीर्घकालीन होऊ शकतात. क्षीरसागर कुटुंबाकडे दीर्घकाळ खासदारकी होती, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये आजही त्यांचा संपर्क, प्रभाव आणि उपद्रवक्षमता सारेच आहे. त्यामुळे ते अनेक ठिकाणी राजकीय 'घडी' बसविण्यात भूमिका घेऊ शकतात. 

Advertisement

Advertisement