Advertisement

धनंजय मुंडेंचे 'ओबीसी पर्व'        

प्रजापत्र | Sunday, 19/10/2025
बातमी शेअर करा

 संजय मालाणी
बीड दि.१८: 'कोणत्या समाजाचा द्वेष करायचा नाही, कोणत्याही समाजाला विरोध देखील नाही, मात्र ओबीसींच्या हक्काच्या संरक्षणासाठी उभे राहायचं आणि गावखेड्यातला गावगाडा पूर्ववत सुरळीत करायचा' अशी आक्रमक आणि तरीही संतुलित भूमिका घेऊन नुकत्याच झालेल्या महाएल्गार सभेच्या निमित्ताने समोर आलेले धनंजय मुंडे हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतले एक वेगळे वळण ठरणार आहेत. राज्याच्या ओबीसी राजकारणातील एक प्रमुख चेहरा म्हणून धनंजय मुंडेंचे राजकारण पुन्हा उभारी घेईल असेच संकेत महाएल्गार सभेने दिले असून धनंजय मुंडेंचे 'ओबीसी पर्व' हे एकूणच राज्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.
      राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरु झाला म्हणा किंवा रंगविण्यात आला म्हणा, तेव्हापासून राजकारणातील मराठा असतील किंवा ओबीसी असतील, बहुतांश राजकीय नेत्यांची गोची झाली ही अडचण आहेच. मराठा समाजातील नेत्यांना तर सामाजिक दबावच इतका वाढला की त्या प्रत्येकाला आपण  जरांगे आंदोलनाचा भाग आहोत याचे फोटो तरी काढणे भाग पडले.ओबीसी नेत्यांची अडचण यापेक्षाही वेगळी,आपण जाहीर भूमिका नेमकी  घ्यायची तरी काय आणि त्याचे परिणाम काय होतील याचे अंदाज बांधता येत नसल्याने राज्यात ओबीसी आंदोलनात ओबीसींच्या मंचावर यायला ओबीसी चेहऱ्यांना देखील संकोचल्यासारखे होत असल्याचे वातावरण मागच्या वर्षभरात राज्याने अनुभवले. एकटे छगन भुजबळ मात्र आक्रमकपणे ओबीसींच्या हक्कांची मागणी लावून धरतात, लक्ष्मण हाकेंसारखे सामाजिक कार्यकर्ते आपल्यापरीने भूमिका घेतात हेच चित्र राज्यात होते. यासाऱ्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेने एकूणच ओबीसी राजकारणाचे परिमाण आणि परिणाम आता बदलणार असल्याचे संकेत दिले आणि त्याला कारण ठरली ती छगन भुजबळ यांच्या मंचावर माजी मंत्री आ. धनंजय मुंडेंची उपस्थिती आणि त्यांनी घेतलेली संतुलित पण ठाम भूमिका.
मुळातच मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या भूमिकेला कोणाचा विरोध कधी नव्हता , त्यामुळेच एसईबीसी किंवा ईड्ब्ल्यूएस आरक्षणाला राज्यात कोणाचा फारसा विरोध झाला नाही. मात्र मराठा आणि कुणबी एकच असल्याचे सांगत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये प्रवेश हा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का असल्याने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण झाले. नेमकी हीच भूमिका घेऊन धनंजय मुंडेंनी ओबीसींच्या हक्काचे रक्षण, मात्र त्याचवेळी समाज म्हणून कोणाचाच द्वेष नाही अशी भूमिका जाहीर केली. ओबीसींच्या मंचावर यायला अनेक जण कचरत असताना छगन भुजबळांच्या जोडीला धनंजय मुंडेंचे येणे हे राज्यात 'माधव' चे समीकरण आता अधिक प्रभावी होणार हे दाखविणारे ठरले आहे. राजकारणात जशी मराठा समाजाची भूमिका महत्वाची, तितकेच महत्व ओबीसींच्या भूमिकेला देखील आहे आणि त्यामुळे ओबीसींचे हक्क शाबूत ठेवून गावगाडा देखील सुरळीत राहिला पाहिजे अशी भूमिका मांडताना धनंजय मुंडेंनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंची व्यापकताच पुढे नेत असल्याचे जाहीर केले.
आजच्या घडीला छगन भुजबळ हेच राज्यातील ओबीसी चळवळीचा चेहरा आहेत, एल्गार सभेच्या माध्यमातून भटक्या विमुक्तांचे नेते असलेल्या लक्ष्मण गायकवाडांपासून 'माधव'मधील महत्वाचा घटक असलेल्या आ. गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे आणि आ. धनंजय मुंडे यांनी ते ठामपणे अधोरेखित केले. आज राज्याचा चेहरा असलेले छगन भुजबळ आज ना उद्या केंद्रीय राजकारणात जाणारच आहेत, ते देशव्यापी ओबीसी चेहरा होत असताना, राज्यातला ओबीसी चेहरा म्हणून पुढे येण्याची संधी भविष्यात धनंजय मुंडेंना असू शकते, छगन भुजबळ यांनी देखील इशाऱ्याइशाऱ्यामध्ये तसे ध्वनित केलेच ,त्यामुळेच 'एकच पर्व, ओबीसी सर्व' च्या घोषणेत आपल्या भाषणाची सुरुवात आणि शेवट केलेल्या आ. धनंजय मुंडेंचे 'ओबीसी पर्व' त्यांच्या आणि राज्याच्या राजकारणात देखील वेगळी समीकरणे घडविणारे ठरेल असेच चित्र आहे.

Advertisement

Advertisement