बीड : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता सर्वांनाच जिल्हापरिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची प्रतीक्षा होती,. त्यासाठी अखेर राज्य निवडणूक आयोगाने गट गण आरक्षणाचा कार्यक्रम निश्चित केला आहे. गट गण आरक्षणासाठी राज्यभरात एकाच दिवशी आरक्षण सोडत होणार आहे. जिल्हापरिषदेसाठी जिल्हास्तरावर तर पंचायत समित्यांची तालुका स्तरावर होणार आहे. यासाठी १३ तारखेला आरक्षण सोडत सभा घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
राज्यात मागच्या तीन वर्षात जिल्हापरिषद पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आता सर्वोच्च न्यायालयानेच यासाठी ३१ जानेवारीच्या डेडलाईन दिली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद , पंचायत समिती निवडणुकीच्या कार्यक्रमांना गती देण्याची सुरुवात केली आहे. यासाठी यापूर्वी जिल्हापरिषद अध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले होते तर बीड जिल्ह्यात पंचायत समिती सभापतींच्या आरक्षणाची सोडत देखील काढण्यात आली. त्यामुळे सर्वांना गट गण आरक्षणाची प्रतीक्षा होती.
त्यासाठी आता राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण करण्याकरिता जागा निश्चित करून आयुक्तांकडे तसा प्रस्ताव ६ ऑक्टोबरला पाठवायचा आहे तर आयुक्तांनी त्याला ८ ऑक्टोबरपर्यंत मंजुरी द्यायची आहे. त्यानुसार १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत सभा आयोजित करावयाची आहे. जिल्हापरिषदेसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तर पंचायत समित्यांची तालुकास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आरक्षण सोडत होणार आहे.
यावेळचे आरक्षण ही पहिली निवडणूक समजून काढण्याचे देखील स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे आता या आरक्षण सोडतीमध्ये मागील आरक्षणाचा विचार केला जाणार नाही.

प्रजापत्र | Wednesday, 01/10/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा