मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून राज्यात विशेषत (Maharashtra Weather) मराठवाड्यात पावसानं हाहाकार उडाला आहे. जिथं दुष्काळ असतो त्या जिल्ह्यांमध्ये महापूर आल्यानं गंभीर स्थिती निर्माण झालीय. यातच आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार (Rain)येत्या चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल तर मराठवाडा विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
राज्यातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. यात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर नंदुरबार, धुळे, छत्रपती संभागीजनगर, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा विदर्भातही जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.पश्चिम विदर्भ आणि लगतच्या भागात असलेल्या कमी दाबाचा पट्टा वाढत आहे. पश्चिम विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रावर हा पट्टा आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस कोकण, गोव्यात, तर दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय मराठवाडा, विदर्भात येत्या दोन ते तीन दिवसात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळतील.बीड, धाराशिव, अहिल्यानगर या तीन जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका सोलापूर जिल्ह्याला बसत आहे. सीना नदीत पाण्याचा विसर्ग तब्बल २ लाख क्युसेकपर्यंत पोहोचल्यानं पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झालाय. अनेक गावं पाण्याखाली असून जनजीवन विस्कळीत झालंय.