Advertisement

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलली

प्रजापत्र | Friday, 26/09/2025
बातमी शेअर करा

मुंबई : राज्यात मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळं काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यानं विविध राजकीय पक्षांकडून रविवारी म्हणजेच  २८ सप्टेंबर २०२५ ला होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं  महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025  आता 28 सप्टेंबर 2025 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

             महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025  जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार  परीक्षा दिनांक 28 सप्टेंबर, 2025 रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवरील 524 उपकेंद्रांवर उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. तथापि, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गांवाचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने पत्र क्रमांक मलोआ-११२५/प्र.क्र.२३६/मलोआ, दिनांक 26 सप्टेंबर, 2025 अन्वये केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.या निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025, दिनांक 28 सप्टेंबर 2025 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 09 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येईल.

 

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025  परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक 09 नोव्हेंबर, 2025 रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 चा सुधारित दिनांक शुद्धिपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती करणारं पत्र लिहिल्याची माहिती दिली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार  राज्यात विविध भागात झालेला पाऊस, पूरस्थिती आणि येत्या 2-3 दिवसांत आणखी पावसाचा हवामान खात्याचा इशारा पाहता, येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती करणारे एक पत्र राज्य सरकारने एमपीएससीला पाठविले होते. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आयोगाने दिले होते. राज्यातील विविध भागातील परीक्षार्थींनी अशाप्रकारची मागणी आमच्याकडे केली होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील एमपीएससीकडे परीक्षा बदलण्याची मागणी केली होती.  

Advertisement

Advertisement