मुंबई : बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान राज्यात जाणवण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय होणार असून, किमान ३० सप्टेंबरपर्यंत तरी मॉन्सूनला निरोप मिळण्याची शक्यता नाही. २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.२६ तारखेपासून या हवामान बदलाचा प्रभाव अधिक स्पष्ट होईल. विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व व दक्षिण भागांत पावसात वाढ होण्याची शक्यता असून, २७ तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.२८ तारखेला पावसाचा जोर राज्याच्या पश्चिम भागांमध्ये अधिक जाणवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.काढणीस आलेली पिके पावसापासून सुरक्षित ठिकाणी हलवावीत. मोकळ्या जागेत कडबा, सोयाबीन, मूग किंवा इतर काढलेली धान्ये ठेवण्याचे टाळावे. सुकवणीसाठी बंदिस्त जागेचा वापर करावा. हवामान बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन काळजीपूर्वक करावे आणि स्थानिक हवामान केंद्रांकडून मिळणाऱ्या माहितीवर आधारित निर्णय घ्यावा, असा सल्ला अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.