मुंबईः विविध जिल्ह्यांमधील ९५ नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच इतर विविध ३१ नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील ३५ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १५ फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २२ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी येथे दिली.
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १५ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर २२ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर १ मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ८ मार्च रोजी प्रसिद्ध केल्या जातील, असेमदान यांनी सांगितले.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती मदान यांनी दिली.
नगरपरिषदा/ नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी:
औरंगाबादः सोयगाव. जालनाः बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, परभणीः पालम, *बीडः केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी.* लातूरः जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर- अनंतपाळ. उस्मानाबादः वाशी. नांदेडः भोकर, हिमायतनगर, नायगाव. हिंगोलीः सेनगाव, औंढा नागनाथ.
ठाणेः अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, मुरबाड, शहापूर, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर. रत्नागिरीः मंडणगड, सिंधुदुर्गः कसई- दोडामार्ग, वाभवे- वैभववाडी. पुणेः राजगुरूनगर, चाकण. नाशिकः चांदवड, निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी.
धुळेः साक्री, नंदूरबारः धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, जळगावः भडगाव, वरणगाव. अहमदनगरः अकोले, कर्जत, पारनेर, जामखेड, शेवगाव.
अमरावतीः भारकुली, तिवसा, धारणी, नांदगाव- खंडेश्वर. बुलडाणाः संग्रामपूर, मोताळा. यवतमाळः महागाव, कळंब, झरी, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव. वाशीमः मानोरा. नागपूरः मोवाड, वाडी, हिंगणा, कुही, भिवापूर. वर्धाः कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर. भंडाराः मोहाडी, लाखनी, लाखांदूर. गोंदियाः सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी. चंद्रपूरः चिमूर, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती. गडचिरोलीः मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड