अंबाजोगाई दि.८(प्रतिनिधी): तालुक्यातील सुगाव येथे मराठा समाजातील तरुण नितीन माणिकराव चव्हाण यांनी ३० ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.आज आ.धनंजय मुंडे यांनी चव्हाण यांच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत त्यांच्या कुटुंबीयांना नाथ प्रतिष्ठान मार्फत एक लाख रुपयांची तातडीची मदत केली.
नितीन चव्हाण यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी देखील धनंजय मुंडे यांनी स्वीकारल्याचे कुटुंबीयांना सांगितले. तसेच मराठा आरक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या मराठा सेवकांना राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
नेमकं काय घडलं होतं ?
मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर अनेक मराठा बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले . बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथील ३७ वर्षीय नितीन चव्हाण यांनी ३० ऑगस्ट रोजी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. सोमवारी शोकाकुल कुटुंबाला भेट देणारे खा.बजरंग सोनवणे यांनी या घटनेचा संबंध मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाशी जोडला होता. मृतांचे मित्र मदन परदेशी म्हणाले की, मुंबईत आंदोलनादरम्यान जरांगे आणि मराठा समाजाच्या सदस्यांना झालेल्या त्रासामुळे चव्हाण व्यथित झाले होते. चव्हाण हे जरांगे यांचे कट्टर समर्थक होते आणि मराठा आरक्षणासाठी त्यांच्या गावात सक्रियपणे काम करत होते .बांधकाम कामगार म्हणून काम करणारे चव्हाण यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि आई असा परिवार आहे .
दरम्यान, आ.धनंजय मुंडे यांनी मृत नितिन चव्हाण यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देत नाथ प्रतिष्ठान मार्फत एक लाख रुपयांची तातडीची मदत केली.नितीन चव्हाण यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी देखील धनंजय मुंडे यांनी स्वीकारल्याचे कुटुंबीयांना सांगितले.