बीड दि.४ (प्रतिनिधी): आरोग्य विभागामध्ये कंत्राटी असणार्या कर्मचार्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करत आहेत. आज गुरुवार (दि.४) रोजी बीड येथील कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागातील कर्मचारी कंत्राटी बेसवर काम करत आहेत. या कर्मचार्यांना नियमित शासन सेवेत सामावून घेण्यात यावे, बदली धोरण राबवण्यात यावे, वेतनवाढ करण्यात यावी यांसह इतर मागण्यांसाठी कर्मचार्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे आरोग्य विभागाचे कामकाज कोलमडून पडले. आज कर्मचार्यांनी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढला होता. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी कर्मचार्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर केले.