Advertisement

कोकणसह मुंबई, पुण्यात अतिमुसळधार!

प्रजापत्र | Tuesday, 19/08/2025
बातमी शेअर करा

 मुंबई : राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालंय. मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय. मुंबई, पुणे घाटमाथा, कोकण, रायगड आणि पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्यासह विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

      हवामान विभागाने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह, पुणे, सातारा घाटमाथ्यावर मंगळवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केलीय. या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.मुंबईत सोमवारी पावसामुळे लोकलसेवा कोलमडली होती. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचलं होतं. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीही झालीय. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई, ठाणे, पालघरच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. मुंबई गोवा महामार्गावर पावसाचं पाणी साचल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

 

मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाची संततधार सुरू आहे. मराठवाड्यात बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालीय. येत्या तीन दिवसात पावसाचा जोर ओसरला नाही तर पूर येण्याची शक्यता आहे. मुखेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यानं अनेक जनावरं वाहून गेलीत. तर पाच जण बेपत्ता झाले आहेत.कोकणात जगबुडी, अंबा, कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी ओलांडलीय. तर चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीला पूर आला आहे. कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केला असल्यानं नागरिकांना सर्तर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Advertisement

Advertisement