कोल्हापूर : जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळदंगेमधील (Crime)धोंडीबा नानासो फडतारे यांच्या ऊसाच्या शेतात अंदाजे तीन महिन्यांचे अर्भक मृतावस्थेत पुरलेल्या स्थितीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तळंदगे गावातून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. हुपरी पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला असून अर्भक कोणाचं याचा शोध घेण्याचे आव्हान (Police)पोलिसांसमोर आहे.
मृतावस्थेत अर्भक आढळून आले
मिळालेल्या माहितीनुसार, धोंडीराम नानासो फडतरे हे शेतात गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास गेले असता शेतात उकरल्याचे दिसून येताच शंका आली. त्यांना या प्रकरणाचा संशय आल्याने त्यांनी मुलगा विनोद फडतारेला घटनेची माहिती दिली. विनोदला घटनेबाबत संशयास्पद प्रकार वाटताच पोलीस पाटील समीर मुल्लानी यांना माहिती दिली. पोलिस पाटलांनी हुपरी पोलिसांना माहिती देताच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पुन्हा खोदकाम केले असता मृतावस्थेत अर्भक आढळून आले. घटनास्थळी हँडग्लोव्हज, मीठ, व रक्त लागलेल्या पिशव्या व इतर संशयास्पद वस्तू आढळून आल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर असल्याचे दिसून आले.
अर्भकाच्या मृत्युचा शोध घेण्याचे आव्हान
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत इचलकंरजी विभागाचे डीवायएसपी विक्रांत गायकवाड, अप्पर तहसीलदार महेश खिलारे, पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी फॉरेन्सिक लॅबच्या टीमला पाचारण करण्यात आले आणि घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. घटनास्थळापासून पंचतारांकित औद्योगिक वसाहत जवळ असल्याने अनेक परप्रांतीय कुटुंबे भाड्याने वास्तव्यास आहेत. त्यामुळे या घटनेमागे कोण आहे, हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. अर्भकाचा मृत्यु नेमका कसा झाला, कोणत्या कारणामुळे आणि कुणी हे कृत्य केले, याबाबत तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.