Advertisement

पैशांसाठी आईनेच केली ६ दिवसांच्या बाळाची विक्री

प्रजापत्र | Friday, 08/08/2025
बातमी शेअर करा

मुंबई : गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात (Crime)सहा दिवसांच्या बाळाची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे बाळाच्या आईनेच तिच्या मुलाची साडेपाच लाखांना विक्री केली. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच बाळाची सुखरूपरित्या सुटका करण्यात आली असून आईसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        एका सामाजिक कार्यकर्त्याला गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरात लहान मुलांची बेकायदा खरेदी-विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्याने तातडीने ही माहिती एका समाजसेवा करणाऱ्या एका दाम्पत्याला दिली. त्यानंतर आरोपींना रंगेहाथ अटक करण्यासाठी कट रचत समीर शेख या व्यक्तीला फोन करत लहान मूल हवे असल्याचे सांगितले. यानंतर समीर शेखने मुलगी हवी असल्यास चार लाख आणि मुलासाठी साडेपाच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यावर समाजसेवा करणाऱ्याने मुलगा किंवा मुलगी कोणीही चालेल, असे सांगितल्यावर समीरने सहा दिवसांचे बाळ असल्याची माहिती दिली.

बाळाची माहिती मिळताच याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना कळवले. त्यानंतर कट रचल्याप्रमाणे बुधवारी, ६ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस ठरलेल्या ठिकाणी दाखल झाले. तसेच नाझिमा अस्लम आणि फातिमा शेख या दोघी त्या ठिकाणी बाळ घेऊन आल्या. त्याचवेळी पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडे काही कागदपत्रे आढळली असून त्यानुसार बाळाची जन्मतारीख १ ऑगस्ट आहे आणि त्यावर सुमय्या खान ही मुलाची आई म्हणून नोंद असल्याचे दिसून आले.दरम्यान पोलिसांनी अटक केल्यानंतर सुमय्या हिनेच समीर शेख याला बाळ विक्रीस दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी बाळाची सुटका करत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामधील नाझिमा अस्लम हिच्यावर या आधीही बाळ विक्री केल्याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement