नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या या बैठकीला विशेष महत्व होतं. मात्र बैठक सुरु असताना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला. यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीवरुन बैठकीत तणाव निर्माण झाला. या वादाची नाशिकमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
शिवसेना (उबाठा)च्या शालिमार येथील कार्यालयात बैठक सुरु होती. बैठकीत एक-एक करुन पदाधिकारी आपले मत व्यक्त करत होते. त्याचवेळी शिवसेना(उबाठा) चे दिंडोरीचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे भाषणासाठी उभे राहिले होते. त्यांनी भाषणाच्या शेवटी विधानसभा निवडणुकीचे स्वत:चे मत मांडले. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात वसंत गितेंचा पराभव झाला. त्याविषयी बोलताना जयंत दिंडे म्हणाले, आपण एमडी ड्रग्जचा मुद्दा नीट हाताळला नाही. तो मुद्दा जर प्रचारात घेतला नसता तर वसंत गितेंचा विजय झाला असता अशा स्वरुपाचे वक्तव्य दिंडे यांनी केले. तिथेच वादाला तोंड फुटलं.