Advertisement

 संपादकीय अग्रलेख- दादांची हतबलता?

प्रजापत्र | Friday, 08/08/2025
बातमी शेअर करा

कोणाचाही मुलाहिजा न राखता थेट भूमिका घेणारा कणखर नेता अशी ओळख असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात नागरिकांशी बोलताना 'तुम्हाला कोण पालकमंत्री हवा तो घ्या' असे म्हणण्याची वेळ यावी हे ना त्यांच्या दृष्टीने भूषणावह आहे ना जिल्ह्याच्या दृष्टीने फार चांगले आहे. पण अजित पवारांना असे बोलण्याची वेळ का आली याचेही चिंतन स्वतः अजित पवारांनी करणे आवश्यक आहे. सारे काही प्रशासनाच्या जीवावर सोडून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींकडे दुर्लक्ष होणार असेल तर वाट्याला हतबलतेशिवाय काहीच येत नसते.
 

बीड जिल्हा हा तसा सातत्याने बारामतीकर पवारांच्या कलाने चालणारा अशीच ओळख राज्याच्या राजकारणात आहे. अगदी दिवंगत गोपीनाथ मुंडे राज्याच्या राजकारणात सक्रिय असताना देखील पवारांच्या (मग ते थोरल्या असतील किंवा धाकल्या ) विचारांना येथील जनतेने कायम बळ दिले. बीड जिल्हा बारामतीच्या ओंजळीने पाणी पितो अशी ओरड व्हावी इतकी निष्ठा या जिल्ह्याने पवारांशी दाखविली. पुढे पवारांच्या घरात दोन विचारधारा झाल्या तरी जिल्ह्याने अजित पवारांच्या पक्षाला सहा पैकी त्यांनी लढविल्या विधानसभेच्या ४ पैकी ३ जागा दिल्या. हे सारे यासाठी सांगायचे की शरद पवार काय अजित पवार काय, यांच्यासाठी जिल्ह्यातील जनतेचे योगदान स्पष्ट व्हावे. मागच्या काळात निर्माण झालेल्या काही राजकीय, सामाजिक परिस्थितीमुळे  आज अजित पवारांकडे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबादारी आलेली आहे. आतापर्यंत ज्यांच्या बारामतीहून बीडची सूत्रे हलायची, आता त्याच बारामतीकरांच्या हाती थेट बीडचे पालकत्व आले म्हणल्यावर जिल्ह्यातील जनतेच्या, लोकप्रतिनिधींच्या, कार्यकर्त्यांच्या आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या तर त्यात आश्चर्य कसले?
पण त्याच बीड जिल्ह्यात नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून अजित पवारांसारखा नेता उद्विग्न  होतो, आणि 'आम्ही काम करतोय , आम्हाला काम करू द्या , नाहीतर तुम्हाला पाहिजे तो कोणीही पालकमंत्री घ्या ' अशी हतबलता दाखवितो हे रुचणारे , पचणारे नाही. ' आज पर्यंत कोणी पाहिले नव्हते, आता आम्ही करतोय ' असे म्हणणे अजित पवारांसारख्या नेत्याकडून तरी अपेक्षित नाही . 'आज पर्यंत कोणी पाहिले नाही' असे अजित पवार म्हणत असतील तर त्यांचा रोख कोणाकडे आहे? मुळात सामान्य नागरिकांना थेट अजित पवारांसमोर तक्रारी , समस्या मांडण्याची वेळ का आली याचा विचार अजित पवारांनी करायला हवा होता. अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि जिल्ह्याचा सारा कारभार प्रशासन भरोसे सुरु आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दादांच्या कानाला लागायचे आणि बंद खोलीत दादांना बोलायचे, एकदा दादा खुश म्हणल्यावर त्या अधिकाऱ्यांना मग कोणालाही, अगदी लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेण्याची आवश्यकता वाटत नाही हे जिल्ह्यातील सध्याचे वास्तव आहे. बरे प्रशासनाने तितक्या जबाबदारीने काम केले असते तर ते देखील एकवेळ खपले असते, मात्र अजित पवार येणार म्हटले की प्रशासनाची 'नौटंकी ' सुरु होते, रस्ते स्वच्छ कर, दुभाजक सजव , सारे काही ''आलबेल  कसे आहे ते दाखविण्याचा प्रयत्न होतो आणि प्रत्यक्षात  वास्तव मात्र वेगळेच असते. ते वास्तव मग असे अचानक थेट अजित पवारांच्याच समोर येते. इव्हेन्टगिर्ती करण्यात प्रशासन मग्न आहे आणि अगदी लोकप्रतिनिधींनाही फारसे विचारात घेतले जात नसेल तर लोक बोलणारच , उद्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना देखील लोक विचारणार , त्यावेळी अजित पवार कोणाकोणावर आपली उद्विग्नता आणि हतबलता व्यक्त करणार आहेत? जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या , पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांना, समस्यांना असली हतबलता हे उत्तर नसते , तर ही वेळ का आली? कोणाचे कुठे काय चुकत आहे याचे चिंतन होणे आवश्यक आहे.
अजित पवारांची स्वतःची यंत्रणा आहे, त्यामुळे त्यांची पाठ फिरली की जिल्ह्यातील परिस्थिती कशी होते हे पवारांनी ठरवले तर त्यांना समजणे अवघड नाही. मात्र वास्तव खरोखर समजून घ्यायचे आहे का , हा प्रश्न आहे. आज  साध्या साध्या गोष्टीसाठी देखील सामान्यांना प्रशासनाशी संघर्ष करावा लागत आहे. अजित पवार प्रत्येक प्रकरणात 'कोणाच्याही राजकीय दबावात येऊ नका ' असे बोलून टाळ्या मिळवून मोकळे होतात , पण दबावात येऊ नये याचा अर्थ राजकीय कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांचा किमान सन्मान राखावा इतका 'विवेक' खाली प्रशासनात शिल्लक आहे का याचीही माहिती अजित पवारांनी घ्यावी . त्याशिवायची उद्विग्न हतबलता काय कामाची?

Advertisement

Advertisement