विटा : पत्नीच्या निधनाचा धक्का बसल्याने हृदयविकाराचा त्रास झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना पतीचाही मृत्यु झाला. आळसंद (ता. खानापूर) येथे बुधवारी पत्नीच्या रक्षाविसर्जन विधीदिवशीच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुनीता धनाजी जाधव (वय ३७) व धनाजी किसन जाधव (४३, दोघेही रा. आळसंद) असे पती-पत्नीचे नाव आहे.
आळसंद येथील सुनीता जाधव यांचे दि. २ ऑगस्टला अल्पशा आजाराने निधन झाले. त्याचा धक्का पती धनाजी यांना बसल्याने त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने विट्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने पत्नी सुनिता यांचा रक्षाविसर्जन विधीचा कार्यक्रम बुधवारी (दि. ६) घेण्यात आला होता.परंतु, पती धनाजी यांना पुन्हा हृदयविकाराचा धक्का बसल्याने बुधवारी पहाटे साडेतीन वाजता त्यांचाही मृत्यु झाला. या घटनेची माहिती आळसंद गावात मिळताच गावावर शोककळा पसरली. पत्नी सुनीता यांच्या रक्षाविसर्जन विधीदिवशीच पती धनाजी यांचीही प्राणज्योत मालविल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे.