अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी २०२५ अखेर बरोबरीत सुटली आहे. अत्यंत रोमांचक झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने शेवटच्या दिवशी इंग्लंडला ६ धावांनी पराभूत केले. त्यामुळे मालिकेत २-२ अशी बरोबरी झाली. भारताच्या या विजयासह ही मालिकाही संपली. या मालिकेतील सर्व सामने अत्यंत चुरशीने खेळण्यात आले होते. अखेर मालिकाही बरोबरी संपली.
पाचव्या सामन्यात इंग्लंडसमोर भारताने ३७४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला ८५.१ षटकात ३६७ धावाच करता आल्या. जो रुट आणि हॅरी ब्रुक यांनी शतकं केली होती. मात्र मोहम्मद सिराजने केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे चित्र पालटले. त्याला प्रसिद्ध कृष्णाची साथ मिळाली.भारताने कसोटी मालिकेत सर्वात कमी धावांच्या फरकाने जिंकलेला हा सामना ठरला.या सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर थांबवण्यात आला होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी इंग्लंडला ३५ धावांची आणि भारताला ४ विकेट्सची गरज होती. यावेळी इंग्लंडकडून जॅमी स्मिथ आणि जॅमी ओव्हरटन हे नाबाद होते. ओव्हरटनने चौकार मारत चांगली सुरुवात केलेली. पण सिराजने स्मिथला ७८ व्या षटकात २ धावांवरच माघारी धाडले. त्यामुळे इंग्लंडचे टेन्शन वाढले होते.
त्यानंतर ८० व्या षटाकात जेमी ओव्हरटनलाही सिराजनेच पायचीत पकडले. तरी नंतर ऍटकिन्सनला जोश टंग साथ देत होता. पण अखेर टंगला ८३ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने शून्यावर त्रिफळाचीत केले.त्यामुळे खांदा निखळला असतानाही ख्रिस वोक्स मैदानात उतरला. त्याने ऍटकिन्सला साथ दिली होती. ऍटकिन्सननेही चिवट झुंज दिली. पण अखेर मोहम्मद सिराजने ऍटकिन्सनला १७ धावांवर त्रिफळाचीत करत इंग्लंडचा डाव संपवला.या डावात याआधी इंग्लंडने झॅक क्रॉली (१४), बेन डकेट (५४) आणि ऑली पोप (२७) यांच्या विकेट्स १०६ धावांवर गमावल्या होत्या. पण त्यानंतर जो रुट आणि हॅरी ब्रुक यांनी १९५ धावांची भागीदारी केली. दोघांनीही शतकं केली. रुटने १५२ चेंडूत १०५ धावा केल्या, तर हॅरी ब्रुकने ९८ चेंडूत १११ धावांची खेळी केली. पण जेकब बेथल ५ धावांवरच माघारी परतला.
या डावात भारतीय वेगवान गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजने ५ विकेट्स घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने ४ विकेट्स घेतल्या. आकाश दीपने १ विकेट घेतली.तत्पुर्वी या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी भारताने पहिल्या डावात ६९.४ षटकात सर्वबाद २२४ धावा केल्या. भारताकडून करुण नायरने ५४ धावांची अर्धशतकी झुंज दिली. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही. इंग्लंडकडून गस ऍटकिन्सनने ५ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर इंग्लंडने ५१.२ षटकात २४७ धावा केल्या. इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. हॅरी ब्रुकने ५३ धावा केल्या, तर बेन डकेटने ४३ धावा केल्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. आकाश दीपने १ विकेट घेतली. इंग्लंडने या डावात २३ धावांची आघाडी घेतली.दुसऱ्या डावात भारताने चांगली फलंदाजी करताना ८८ षटकात ३९६ धावा केल्या. भारताकडून यशस्वी जैस्वालने ११८ धावांची शतकी खेळी केली. आकाश दीपने ६६ धावा, रवींद्र जडेजाने ५३ धावा आणि वॉशिंग्टन सुंदरने ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून जोश टंगने ५ विकेट्स घेतल्या. भारताने २३ धावांची पिछाडी असल्याने इंग्लंडला ३७४ धावांचे लक्ष्य दिले होते.