समीर लव्हारे
बीड -साधारणत: दोन महिन्यापूर्वी रामटेक बंगला कार्यकर्त्यांनी बहरला होता. हा तोच बंगला जिथे दिवंगत गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राहायचे. या बंगल्याने त्या काळात राज्यभरातील मुंडे भक्तांचा मेळा कायम अनुभवलेला. 1999 नंतर थेट 2025 मध्ये पुन्हा तोच मुंडे भक्तांचा मेळा या बंगल्यात जमला आणि त्या मुंडे भक्तांना तुमच्या कोणत्याही अडचणीत मी कायम उभी आहे हा शब्द पंकजा मुंडेंनी दिला. मागच्या काळात करावा लागलेला राजकीय संघर्ष, काही काळ राजकीय विजनवासाची आलेली परिस्थिती, त्या परिस्थितीला तितक्याच धैर्याने सामोरे जात आज पुन्हा एकदा बदलेलं राजकीय चित्र आणि या सर्वांमागे असलेली मुंडे या नावावर डोळे झाकून प्रेम करणारी कार्यकर्त्यांची शक्ती म्हणजे पंकजा मुंडे.
राज्याच्या राजकारणातलं पंकजा मुंडे हे नाव म्हणजे राजकीय पटलावरून दुर्लक्षित करता येणार नाही असं नाव. दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा घेऊन राजकारणात आलेल्या पंकजा मुंडे 2009 पासून आजपर्यंत वेगवेगळ्या राजकीय चढउतारांच्या साक्षीदार आहेत. 2009 ला त्या पहिल्यांदा आमदार झाल्या त्यावेळी गोपीनाथ मुंडे नावाची मोठी राजकीय शक्ती त्यांच्या पाठिशी होती. नंतरचा काळ मात्र सर्वच मुंडे भक्तांसाठी तसा संघर्षाचा राहिला.गोपीनाथ मुंडेंच्या अकाली जाण्यानं संपूर्ण राज्यातील मुंडे भक्तांना आलेलं पोरकेपण त्यांना जाणवू न देणं हे मोठं आव्हान पंकजा मुंडेंसमोर होतं. ते पेलतानाच राज्यातील सत्ता बदलाचं आव्हानही त्यांना पेलायचं होतं. स्वत:चं दु:ख बाजूला ठेवून त्यांनी काढलेली संघर्षयात्रा, त्याला मिळालेला प्रतिसाद, त्यातून राज्यात झालेलं सत्ता परिवर्तन, पंकजा मुंडेंकडे आलेली ग्रामविकास मंत्रीपदाची जबाबदारी आणि त्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात निर्माण केलेलं पायाभूत सुविधांचं जाळं, हा सारा काळ म्हणजे पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांच्या नजरेतलं ताईपासून ताईसाहेब होणं हा होता.
राजकारणात कोणतीच परिस्थिती कायम राहत नाही. 2019 ला पंकजा मुंडेंनाही त्याचा अनुभव घ्यावा लागला. निवडणूकीत झालेला पराभव, त्यानंतर काही काळ पक्षातूनच काहीसं अव्हेरलं जाणं. कोणत्याही निवडणूकीत कार्यकर्त्यांनी आता पंकजा मुंडेंचं पुनर्वसन होणार अशा अपेक्षा ठेवायच्या आणि त्याचवेळी पक्षाकडून मात्र कोणतीच भूमिका घेतली जात नसायची. पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना अपेक्षा ठेवू नका असंही सांगू शकत नव्हत्या. आणि काही बोलूही शकत नव्हत्या. राजकारणातल्या कोंडीचा हा प्रसंग होता.सुरुवातीला काही काळ आक्रमक भूमिका घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलाही मात्र त्यानंतर शांतता आणि सबुरी यालाच त्यांनी आपली शक्ती बनवलं आणि त्याला जोड दिली ती राज्याच्या कोणत्याही भागात गेलं तर केवळ मुंडे नावावर प्रेम करणार्या राज्यभरातील मुंडे भक्तांची. दिवंगत गोपीनाथ मुंडेंची राज्यात भाजपं वाढविण्यात हयात घालविली होती. त्यामुळेच हा पक्ष माझ्या वडिलांनी वाढवलाय त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा विचार कधीच करणार नाही ही भूमिका त्यांना वारंवार स्पष्ट केली आणि राज्यभरातल्या मुंडे भक्तांची शक्ती भाजपसोबत अढळपणे उभी राहिल हे देखील पाहिलं.आणि त्यातूनच केंद्रीय नेतृत्वाला पंकजांच्या संघर्षाची, त्यांच्या शक्तीस्थळाची दखल घेणं आवश्यक वाटलं.
तसं पहायला गेलं तर राजकारणात जेव्हा सरशी होत असते त्यावेळी सोबत येणारे अनेकजण असतात. संघर्षाच्या काळात लोकांना सोबत टिकवून ठेवणं तितकंंस सोपं नसतं. राज्यातल्या मोठमोठ्या नेत्यांना हा अनुभव घ्यावा लागला. पंकजा मुंडे मात्र त्याबाबतीत अपवाद म्हणाव्या लागतील. आपला नेता आज आपल्याला काही देवू करण्याच्या परिस्थितीत नाही हे माहित असताना पंकजा मुंडेंची साथ कोणी सोडली असं फारसं झालं नाही. किंबहुना आपल्या नेतृत्वाची संस्था वाचविण्यासाठी निधी जमा करण्याचं भाबडं प्रेम देखील कार्यकर्त्यांनी दाखविलं असं प्रेम फार कमी नेतृत्वाच्या वाट्याला येतं. 2019 ते 2024 हा तसा पंकजा मुंडेंसाठी आव्हानांचा काळ होता. पण या काळात त्यांच्यावर निस्सिम प्रेम करणारी कार्यकर्त्यांची शक्ती कधी कमी झाली नाही. पंकजा मुंडे येणार म्हटलं की कार्यकर्त्यांची गर्दी होणार हे ठरलेलंच. ती गर्दी हीच पंकजा मुंडेंची शक्ती ठरली.दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय संघर्षदेखील सामान्यांच्या गर्दीनेच सफल केला होता. तीच सामान्यांची शक्ती पंकजा मुंडेंसोबत आहे. आता याच गर्दीसाठी काम करण्याचं आणि या गर्दीतल्या प्रत्येक चेहर्यामागं खंबीरपणे उभं राहण्याचा संकल्प पंकजा मुंडेंनी रामटेक बंगल्यातून केला आहे. या संकल्पाला सिध्दीचं बळ मिळालं तर पंकजा मुंडे या नेतृत्वाचं वेगळेपण अधिकच बहरणार आहे. ते तसं बहरो याच त्यांना शुभेच्छा