अंबाजोगाई दि.८(प्रतिनिधी): येथील दैनिक प्रजापत्रचे तालुका प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते जगन सरवदे यांच्या मातोश्री सुलोचनाबाई प्रभाकर सरवदे यांचे वृद्धापकाळाच्या आजाराने आज मंगळवार (दि.८) रोजी पहाटे ४:३० वाजता निधन झाले.
ऐन तारुण्यात पतीच्या निधनानंतर सुलोचनाबाई यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांचा सांभाळ करून त्यांचे वर चांगले संस्कार करून त्यांना समाजात ताठ मानेने जगण्याचे बळ या माऊलीने दिले. आज याच संस्कारांच्या बळावर त्यांची दोन्ही मुले नवनाथ व जगन्नाथ आज समाजात आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत.सुलोचनाबाई यांची प्रकृती गेली अनेक वर्षांपासून वार्धक्याचे आजारामुळे क्षीण झाली होती. आवश्यकतेनुसार त्यांना येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत होते. अलिकडेच त्यांना रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर त्यांची सर्व शुश्रुषा घरीच करण्यात येत होती. यातच सुलोचनाबाई यांनी आज पहाटे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पाश्चात्य जगन्नाथ, नवनाथ ही दोन मुले-सुना, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.एक मनमिळाऊ आणि दुस-यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याच्या स्वभावामुळे सुलोचनाबाई रमाई व बोधीघाट वसाहतीत सर्व परिचित होत्या. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार
सुलोचनाबाई यांच्या पार्थिवावर आज (दि.८) जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण चौक परिसरातील शासकीय दुध डेअरी समोरील सार्वजनिक स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती सरवदे परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.