Advertisement

जहाल नक्षल नेता चकमकीत ठार

प्रजापत्र | Thursday, 05/06/2025
बातमी शेअर करा

गडचिरोली :  महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि झारखंडमधील अनेक हिंसक माओवादी कारवायांचा सूत्रधार जहाल नेता आणि केंद्रीय समिती सदस्य नरसिंहचलम ऊर्फ सुधाकर (६९) याचा खात्मा करण्यात ५ जून रोजी जवानांना यश आले. छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. सुधाकरवर सहा राज्यांत मिळून सुमारे तीन कोटींचे बक्षीस होते.

               छत्तीसगडच्याबिजापूर येथे  राष्ट्रीय उद्यान परिसरात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू होता. या चकमकीत केंद्रीय समिती सदस्य सुधाकर यास कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे. दरम्यान, सध्या या परिसरात शोधमोहीम सुरू असून घटनास्थळी आणखी काही मृतदेह आढळून येतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. चकमकीत नक्षलवादी केंद्रीय समिती नरसिंहचलम उर्फ ​​सुधाकर हा नक्षलवाद्यांचा एक मोठा नेता मानला जात असे. तो अनेक मोठ्या नक्षलवादी घटनांमध्ये सहभागी होता. सहा राज्यांसाठी तो मोस्ट वॉन्टेड होता. छत्तीसगडच्या अबुझमाड भागात झालेल्या चकमकीत जवानांनी १ कोटी रुपयांचा सर्वोच्च नक्षलवादी नेता व प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ  बसवा राजू ऊर्फ गगन्ना ऊर्फ प्रकाश यास २१ मे रोजी ठार केले होते.

 

बसवा राजूनंतर सुधाकरचा खात्मा 
२०१८ मध्ये नक्षलवादी नेता गणपतीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बसवा राजूने त्याची जागा घेतली. बसवा राजूच्या मृत्यूनंतर उरलेल्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी सुधाकर हा एक होता. त्याचा खात्मा करण्यात यश आल्याने माओवादी चळवळीला हा मोठा हादरा मानला जात आहे.

Advertisement

Advertisement