मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील (transfer) कर्मचाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या करण्यासाठी नवीन ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनचे उद्घाटन सोमवारी महामंडळाच्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी (St )महामंडळाला लागलेले शिफारशींचे दुष्टचक्र दूर होणार आहे.
एसटी महामंडळाच्या सोमवारी होणाऱ्या ७७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कर्मचारी आणि प्रवाशांसाठी महत्त्वाच्या योजनांची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामध्ये या ॲप्लिकेशनचीदेखील सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. महामंडळात सध्या सुमारे ५५०० बदल्यांचे अर्ज आहेत. तर यापूर्वी ४०० पेक्षा जास्त बदल्या शिफारशींच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. नवीन ॲपमध्ये विविध निकषांनुसार बदल्या होणार असल्याने शिफारशींना महत्त्व उरणार नाही.
ॲपद्वारे बदल्या करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. ॲपद्वारे बदल्या केल्याने कुणावरही अन्याय होणार नाही. पती- पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजाराने आजारी व आपापसात बदल्या करण्यात कुठलीही अडचण नसून, या रखडलेल्या बदल्या तत्काळ करण्यात याव्यात.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस