Advertisement

अति झाले आणि हसू आले !

प्रजापत्र | Sunday, 31/01/2021
बातमी शेअर करा

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक एक तर विनाशाला कारणीभूत ठरतो नाही तर हास्याला. कोणत्याही गोष्टीत अति व्हायला लागले की मग त्या व्यक्तीचे हसू व्हायला लागते असा अनुभव सध्या अण्णा हजारेंच्या बाबतीत  होत आहे. मुळातच अण्णा हजारेंवर मागच्या काही वर्षात भाजप धार्जिणे असल्याचा आरोप होत असतानाच आता अण्णा हजारेंनी भाजच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीनंतर आपले उपोषण मागे घेतले, त्यामुळे तर अण्णा सोशल मीडियात चेष्टेचा विषय झाले आहेत. दुरीकडे सेनेच्या मुखपत्राने डिवचल्यानांतर ‘मी तुमच्या मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढू का ?’ असा सवाल हजारेंनी केल्याने ’पुरावे आहेत तर अण्णा गप्प का ? ते कशाची वाट पाहत होते असा सवाल सोशल मीडियात विचारला जात आहे. मागच्या काही काळात राज्यात सर्वाधिक ट्रोल झालेल्या व्यक्तींमध्ये अण्णा हजारेंच्या समावेश आहे.
अण्णा हजारे यांचे महाराष्ट्राच्या समाजकारणात मोठे योगदान आहे. राळेगणसिद्धी सारख्या गावातून त्यांनी सुरु केलेले ग्रामविकासाचे मॉडेल असेल किंवा त्यानंतर माहिती अधिकार कायद्यासाठी त्यांनी दिलेला लढा, अण्णा हजारेंना एकेकाळी भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा सेनापती असेही म्हटले जायचे. अण्णा हजारे काय म्हणतात याला राजकीय वर्तुळात मोठे महत्व होते. अगदी 2012 च्या अण्णा आंदोलनाने दिल्ली देखील हादरली होती.
मात्र कोणत्याही गोष्टीचा, मग तो मागण्यांच्या हट्टाचा असेल किंवा आणखी कशाचा अतिरेक उपयोगाचा नसतो. तसेच अशा उंचीवरच्या व्यक्तीने स्वतःला तटस्थ ठेवावे लागते, आणि ते जनतेला वाटावे लागते. मात्र दिल्लीतील आण्णा आंदोलनानंतर आण्णा हजारेंच्या या प्रतिमेला धक्का लागला हे वास्तव आहे.म्हणूनच आता राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे सोशल मीडियात मोठ्याप्रमाणावर ट्रोल होत आहेत. अण्णांवर सोशल मीडियातून ‘भाजपचे नेते ’ या शब्दापासून ते अनेक विशेषणे लावली जात आहेत. अण्णा ह्जारेंनीही आपले होऊ घातलेले उपोषण भाजप नेत्यांच्या भेटीनंतर स्थगित केल्यानंतर तर ते सोशल मीडियात चेष्टेचा विषय ठरले आहेत. आणि अशातच त्यांनी ‘तुमच्या मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढू का ? ’ असा इशारा शिवसेनेला दिला आहे. जर अण्णा ह्जारेंकडे भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत तर ते कशाची वाट पाहत आहेत? सेनेने डिवचले नसते तर अण्णा त्या पुराव्याचे काय करणार होते ? असे सवाल नेटकरी विचारात आहेत.

 

Advertisement

Advertisement