Advertisement

गढीचा उड्डाणपूल तांत्रिकदृष्ट्या चुकीचा

प्रजापत्र | Wednesday, 28/05/2025
बातमी शेअर करा

६ बळी घेणाऱ्या अपघातानंतर आरटीओंचा अहवाल

बीड दि. २७ (प्रतिनिधी ) : गेवराई तालुक्यातील गढी येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातामध्ये ६ जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाने हा अपघात (BEED ACCIDENT )  गांभीर्याने घेतला आहे. बीडच्या प्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने  सदर अपघाताचे विश्लेषण केले असून गढीचा कारखान्यासमोरील उड्डाणपूल (Overbridge)  तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्याचे सांगत या अपघाताचे हा पूल देखील कारण असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने म्हटले आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) स्वप्नील माने यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना सदरचा अहवाल दिला आहे.बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील गढी येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातामध्ये तब्बल ६ जणांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त वाहन बाजूला काढण्यासाठी मदतीला गेलेल्या व्यक्तींना महामार्गावरून चालणाऱ्या एका टेम्पोने चिरडल्याने सदरचा अपघात झाला होता. या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतानाच या गंभीर अपघाताचे विश्लेषण प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी दोन उड्डाणपूल एकत्र येतात आणि त्यामुळे त्याठिकाणी पाणी साचते, त्यातून मग पाण्यामुळे या ठिकाणी छोटेमोठे अपघात सातत्याने होत असतात असा अहवाल प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे हा उड्डाणपूल तांत्रिक दृष्ट्या चुकीचा असल्याचे देखील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी सदरच्या उड्डाणपुलावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी शिफारस देखील आरटीओंनी केली आहे.

----

महामार्गावरील  दुभाजक देखील लहान

सोलापूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हा अपघात झाला. या महामार्गावरील दुभाजकांवर देखील आरटीओंनी प्रश्नचिन्ह लावले आहे. या महामार्गावरील दुभाजक लहान आहेत, त्यामुळे कोणीही दुभाजक ओलांडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे देखील अपघात होतात असे निरीक्षण देखील आरटीओंनी नोंदविले असून दुभाजकांची उंची वाढविण्याची शिफारस केली आहे.

---

महामार्ग विभागाची नाकारली मदत

सुरुवातीला अपघातग्रस्त झालेले वाहन बाजूला काढण्यासाठी महामार्गविभागाची यंत्रणा क्रेनसह दाखल झाली होती, मात्र सदर वाहन मालकांनी क्रेनमुळे वाहनाचे नुकसान होईल असे सांगून महामार्ग विभागाची मदत नाकारली आणि स्वतःची खाजगी यंत्रणा आणली. महामार्गावर अचानक इतके मोठे लोक दिसल्याने आयशर टेम्पो कारवर आदळेल असे वाटल्याने टेम्पोवाल्याने विरुद्ध दिशेने वाहन घेतले आणि लोक चिरडले गेले असेही या अहवालात म्हटले आहे.

---

बीड, गेवराई बायपासबद्दल देखील आहेत आक्षेप

गढी येथील उड्डाणपूल तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्याचा ठपका आता खुद्द प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनीच ठेवला आहे. दुसरीकडे याच महामार्गावरील बीड शहरात प्रवेश करण्याच्या ठिकाणी वळण रस्त्यांचे असलेले नियोजन देखील चुकीचे असून अपघातांना निमंत्रण देणारे आहे, गेवराई शहराच्या वाळणरस्त्याच्या बाबतीत देखील तीच परिस्थिती असल्याच्या तक्रारी अनेकांनी केलेल्या आहेत. बीड आणि गेवराईच्या वळणरस्त्यांच्या ठिकाणी उड्डाणपूल असावेत अशी मागणी देखील झालेली आहे. अगदी उच्च न्यायालयात देखील (आ. संदीप क्षीरसागर, सय्यद सलीम यांनी दाखल केलेल्या याचिकेत )  महामार्गप्रधिकरणाने देखील उड्डाणपुलाच्या तांत्रिक शक्यता तपासण्याचे शपथपत्र दिले आहे. मात्र मोठ्या राष्ट्रीय महामार्गावरील इतक्या मोठ्या तांत्रिक चुकांची जबाबदारी कोणाची आणि त्या चुका दुरुस्त कधी होणार हा प्रश्न कायम आहे.

---

 

Advertisement

Advertisement