गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि छत्तीसगड (Gadchiroli Naxal Encounter) राज्याच्या सीमावर्ती भागातील जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत आज (दि.२३) ४ जहाल नक्षलवादी ठार झाले. यात २ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. हे नक्षलवादी उपकमांडर दर्जाचे असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दोन महिन्यापूर्वीच भामरागड तालुका व छत्तीसगड सीमेवर कवंडे गावात गडचिरोली पोलिसांनी पोलिस मदत केंद्र सुरु केले. त्या परिसरात नक्षलवादी दबा धरुन असल्याचे कळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाचे ३०० जवान आणि (Gadchiroli Encounter) केंद्रीय राखीव दलाची एक तुकडी गुरुवारी दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदी परिसरात रवाना केली होती.दरम्यान, आज सकाळी नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. जवळपास दोन तास गोळीबार सुरु होता. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता ४ जहाल नक्षल्यांचे मृतदेह सापडले. त्यात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. शिवाय एक स्वयंचलित रायफल, एक ३०३ रायफल, एक भरमार बंदू, वॉकीटॉकी व अन्य साहित्य पोलिसांच्या हाती लागले आहे. यातील मृत उपकमांडर दर्जाचे असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. लवकरच मृत नक्षल्यांची ओळख पटविली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२१ मे रोजी छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यांचा देशातील सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ गगन्ना याच्यासह २७ नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर घाबरलेल्या नक्षल्यांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या (Gadchiroli Naxal Encounter) हालचाली सुरु केल्या होत्या. त्या अनुषंगानेच हे नक्षली कवंडे भागात आले. मात्र, गडचिरोली पोलिसांनी त्यांचा खात्मा केला.मागील तीन दिवसांपासून कवंडे आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. अशा भर पावसात गडचिरोली पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान राबवून मोहीम फत्ते केली. यामुळे घातपात करण्याचे नक्षल्यांचे मनसुबे उधळले गेले.