बीड-येथील पोलीस अधिक्षक यांच्या निवासस्थानातच चक्क गांजा ओढणाऱ्या बाळू बहिरवाळ या पोलीस कर्मचाऱ्याला स्वतः नवनीत कॉवत यांनी रंगेहात पकडल्यानंतर त्या कर्मचाऱ्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर त्याच्यावर बडतर्फीची कारवाई देखील करण्याचे धाडस एसपींनी दाखविले.पण एकीकडे हे सर्व घडले असताना दुसरीकडे या कर्मचाऱ्याकडे गांजा कोठून आला? याचा शोध अद्याप लागलेला नाही.विशेष म्हणजे मागच्या काही वर्षांपासून पेठ बीडमध्ये गांज्याची विक्री सर्रासपणे अजूनही भरदिवसाच सुरु आहे.आता तर या धंद्यात महिलांच्या टोळ्या गांजा विक्रीसाठी सक्रिय झाल्या असल्याने स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादावर हा धंदा तेजीत आल्याचे चर्चिले जाते.
पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बंद तर सोडा पण त्यावर फार अंकुश ही नाही असे चित्र आहे.मोबाईल चोरांची टोळी,मटका,गुटखा यासोबतच गांज्याची देखील मोठ्या प्रमाणावर विक्री या भागात होते.शहरात व्यसनाधीन असलेल्या लोकांना गांजा हवा असेल तर थेट गांधी नगर भागात ते जातात आणि तिथे महिला रस्त्यावर उभा राहून किंवा बसून भरदिवसा गांजा विक्री करतात.अवघे १०० रुपये दिले की एक गांज्याची पुढी त्या महिलेकडून आरामात पिशवीतून काढून दिली जाते.दिवसाला साधारण एक महिला ५ हजारांच्या घरात गांज्याची विक्री करते अशी प्राथमिक माहिती देखील आहे.त्या भागात साधारण गांजा विक्री करणाऱ्या ५ ते ६ महिला सक्रिय असून भरदिवसा आणि तेही रस्त्यावर भरणाऱ्या या बाजाराकडे पोलिसांना साधे लक्ष्य ही नाही हे आश्चर्यकारक आहे. पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानात पोलीस कर्मचारी गांजा ओढताना सापडल्यानंतर बीडमध्ये गांज्याच्या विक्रीवर प्रचंड निर्बंध येतील आणि काही दिवसांसाठी का होईना गांजा हद्दपार होईल असे अपेक्षित होते.इथे मात्र रस्त्यावरच तेही महिला न भिता गांज्याची विक्री करत आहेत. दरम्यान पोलीस अधिक्षक यांनी कर्मचाऱ्यावर दाखविले धाडस आता गांज्याला अभय देणाऱ्यांवर पण दाखविणार का ? हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतोय.
पेठ बीड पोलीस ठाणे वादात
मागील काही दिवसांपासून पेठ बीड पोलीस ठाणे वादात अडकले आहे.पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या कारभारावर सामान्य जनताच नव्हे तर त्यांचे सहकारी देखील मोठ्याप्रमाणावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत.गुन्ह्यात तडजोड,अवैध धंद्यांना अभय,एका मंदिराच्या बंदोबस्तासाठी थेट पैशाची मागणी केल्याच्या तक्रारी पोलीस अधिक्षक यांच्याकडे गेल्यानंतरही त्यांची खुर्ची सहीसलामत राहिली होती.त्यामुळे आपल्या हद्दीत तर 'हम करे सो कायदा' या अविर्भावात ते वावरताना दिसतात.