महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भासह राज्यात अवकाळी (Unseasonal Rain) पवासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी पहाटे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. रायगड, पनवेल, यवतमाळसह अनेक भागात शनिवारी पावासने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.
मुंबई, पुणेकरांना (Rain)उन्हापासून थोडासा दिलासा मिळणार आहे. पुण्यासह राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पुणे वेधशाळे वर्तवली आहे. पुणे शहरासह सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून आज आणि उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात देखील आज दिवसभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई (Unseasonal Rain)आणि उपनगरात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यापासून कर्नाटक, तमिळनाडू आणि मनारच्या आखातापर्यंत दक्षिणोत्तर पसरलेला कमी दाबाचा हवेचा पट्टा सध्या कायम आहे. यामुळे महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये आज (२६ एप्रिल) तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर गडगडाटी वादळ आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.