बीड : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद झालेले न्यायालयांचे कामकाज सोमवार दि. १ फेब्रुवारीपासून नियमितपणे पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहे. उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने तसे निर्देश राज्यभरातील सर्व न्यायालयांना दिले आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेली न्यायालयीन प्रकरणे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी दरम्यान जिल्हा आणि तालुका स्तरावरील न्यायालयांचे कामकाज काही महिने बंद होते. त्यानंतर काही प्रमाणात न्यायालयीन कामकाज सुरु झाले असले तरी ते मोजक्याच विषयांसाठी सुरु होते. न्यायालयीन कामकाज बंद असल्याने वकिलांना देखील मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. तर दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाची प्रकरणे मोठ्याप्रमाणावर प्रलंबित होती. न्यायालयांचे प्रत्यक्ष कामकाज पूर्णक्षमतेने सुरु करण्याची मागणी होत होती. यावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने शिक्कामोर्तब केले आहे. १ फेब्रुवारीपासून राज्यभरातील न्यायालयांमधील कामकाज पूर्ण क्षमतेने आणि थेट सुनवाणीद्वारे सुरु होणार आहे.
प्रजापत्र | Friday, 29/01/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा