मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (ladki bahin yojana) निकषांनुसार चारचाकी कार असलेल्या लाडक्या बहिणींसह एकापेक्षा अधिक वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात आला आहे. आता पुढच्या टप्प्यात वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे. त्यानुसार (ladki bahin yojana) अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री(Cm shinde) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. निवडणूक काही दिवसांवर असल्याने ज्यांनी अर्ज केले, त्या महिलांच्या अर्जांची निकषांच्या आधारे काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही. दोन महिन्यांत राज्यातील दोन कोटींहून अधिक (ladki bahin yojana) महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले. पण, अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्याने सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण आला आणि अन्य योजनांचा बराच निधी या योजनेसाठी वळता करावा लागला. दुसरीकडे राज्यातील अडीच कोटींहून अधिक महिलांच्या कुटुंबांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असू शकते का, याचे उत्तर सरकार शोधू लागले आहे.
आतापर्यंत १२ लाखांहून अधिक महिलांचा लाभ बंद करण्यात आला असून केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ कमी केला आहे. आता शेवटच्या टप्प्यात योजनेतील लाभार्थी आधारलिंक करून ‘आयकर’कडील माहितीनुसार अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध राज्यस्तरावरुनच घेतला जात असल्याचेही सांगण्यात आले.
योजनेचा प्रत्येक लाभार्थी आधारलिंक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे अशी अट आहे. त्यानुसार आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी अजूनपर्यंत झालेली नाही. त्यामुळे आयकर विभागाकडून त्यासंबंधीची माहिती मागविण्यात आली असून आधार व पॅनकार्डच्या आधारे त्या कुटुंबांचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला योजनेतून वगळण्यात येणार आहेत.