डिसेंबर २६ पर्यंत घरोघरी नळ जोडणी देण्याबाबत नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
बीड दि.९ (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पांतर्गत सुरु झालेल्या जलजीवन अभियानाला महाराष्ट्रात मात्र गती मिळत नसल्याचे चित्र आहे. जलजीवन अभियानात राज्यात सुमारे २८ हजार योजना अजूनही अपूर्ण असून बीड जिल्ह्यात सुमारे ९२८ योजना अपूर्ण आहेत. दरम्यान जलजीवन अभियान हा केंद्राचा महत्वाचा कार्यक्रम असून कसल्याही परिस्थितीत डिसेंबर २६ पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळेल यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जलजीवन अभियानाच्या प्रकल्प संचालकांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राज्यात जलजीवन अभियानाला गती देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होत असले तरी प्रत्यक्षात मात्र या योजनेची अंम्मलबजावणी प्रभावी नसल्याचेच चित्र आहे. राज्यात या योजनेच्या कामे पूर्णत्वाचा टक्का पन्नास पेक्षाही कमी आहे. आज घडीला राज्यात मंजूर झालेल्या ५२ हजार योजनांपैकी सुमारे २७ हजार योजना पूर्ण झाल्या असून अद्याप २८ हजार योजना पूर्ण व्हायच्या आहेत. बीडची अवस्था तर राज्याच्या तुलनेत अधिकच वाईट आहे. राज्यात किमान ४७ % योजना पूर्ण झाल्या आहेत, बीडमध्ये मात्र योजना पूर्ण होण्याचा टक्का ३० च्या घरात आहे. जिल्ह्यात जिल्हापरिषदेच्या माध्यमातून १२७३ तर जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून २६ योजना मंजूर आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या ९०३ तर जीवन प्राधिकरणाची पूर्ण झाल्याची माहिती आहे. ज्या योजना पूर्ण झाल्याचे सांगितले जाते , तेथे देखील पाणीपुरवठा सुरळीत आहे असे सांगण्यासारखी परिस्थिती अनेक गावांमध्ये नाही. त्यामुळे आता येत्या काळात कामे गतीने गतीने होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जलजीवनच्या प्रकल्प संचालकांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
---
चौकट
धाराशिवची गती राज्यासारखीच
धाराशिव जिल्ह्यात जिल्हापरिषद यंत्रणेतून ६४६ तर जीवन प्राधिकरणामधून २७ योजना मंजूर होत्या, यातील जिल्हापरिषदेकडील ३१५ तर प्राधिकरणाकडील ३ योजना पूर्ण झाल्या आहेत. सुमारे ४८ % योजना पूर्ण झाल्याचे चित्र या जिल्ह्यात आहे.
----
चौकट
लातूर देखील मागेच
लातूर जिल्ह्यातही जलजीवन अभियानाला फारशी गती नसल्याचेच चित्र आहे. या जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या ९२७ पैकी ३९६ तर जीवन प्राधिकरणाच्या २९ पैकी १६ योजना पूर्ण झाल्या आहेत.

प्रजापत्र | Wednesday, 09/04/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा