नेते येणार असले की हेलिपॅडवर होणारी गर्दी असेल किंवा बैठकांच्या निमित्ताने 'माहिती ' चे प्रशासनाचे ठरलेले उत्तर , आम्ही काहीही केले तरी काय फरक पडतो, आम्हाला कोण अडविणार अशी झालेली मानसिकता या साऱ्यांनाच अजित पवारांच्या कार्यशैलीत स्थान नसल्याचा स्पष्ट संदेश अजित पवारांनी दिला आहे. अजित पवारांच्या बीड जिल्हा दौऱ्यात त्यांनी अनेकांचे कान टोचले आणि ते आवश्यक देखील होते . बीड जिल्ह्याला अजित पवारांच्या शिस्तीचा डोस खरेच आवश्यकच आहे, फक्त हा डोस पचविण्याची क्षमता कार्यकर्ते आणि प्रशासनामध्ये निर्माण कशी करायची हे महत्वाचे .
बीड जिल्ह्याची राज्याच्या पटलावर अतिरंजित झालेली बदनामी , येथील सामाजिक स्वास्थ्याला लागलेली चूड , परस्परांमधील अविश्वासाचे वातावरण आणि पाचवीला पुजलेली बेरोजगारी अशा साऱ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडे बीडचे पालकत्व आले. अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले , मात्र त्यांना आतापर्यंत बीडसाठी हवा तितका वेळ देता येत नव्हता कदाचित, त्यांच्या कालच्या बीडच्या दौऱ्याच्या निमित्ताने ही कमतरता भरून निघाली आणि बीडकरांनाही, मग ते कार्यकर्ते असतील, प्रशासनातील अधिकारी असतील किंवा माध्यमकर्मी , या सर्वांनाच अजित पवार नेमके काय रसायन आहे, आणि या रसायनाशी जुळवून घेणे कशी कसरत आहे हे कळून चुकले असेल.
अजित पवार तसे बोलायला फटकळ म्हणूनच ख्यातकीर्त आहेत. पण त्यांच्या फटकळपणामध्ये देखील एक स्पष्टपणा असतो, उगीच तोंड देखत काही तरी बोलायचे हा त्यांचा स्वभाव नाही, किंवा वास्तवापासून पळ काढण्याची देखील त्यांची वृत्ती नाही, पण त्यांचा हा स्पष्टपणा सर्वांच्याच पचनी पडेल असे नाही. बीडकर आतापर्यंत हे सारे ऐकून होते, आता ते अनुभवण्याची वेळ आहे. बडा नेता येणार म्हटले ही हेलिपॅडवर उडणारी झुंबड बीडसाठी नवीन नाही , बरे हेलिपॅडवर सुरक्षेसाठी वारसीहत अधिकारी देखील असतात, पण ते हाडतूड करणार ते सामान्यांना ,जिल्ह्यातील नेते मंडळींना साधे हटकण्याची देखील हिम्मत दाखवायची कोणी ? आता अजित पवारांनी नेमके यांच्यावरच बोट ठेवले . हेलिपॅडवर इतकी गर्दी येतेच कशी ? पोलीस काय करतात ? या प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांनी द्यावे तरी काय , आणि 'आता हेलिकॉप्टरमध्ये जाऊन बस' असे म्हणल्यावर कार्यकर्त्याने किंवा पुढाऱ्याने तरी करायचे काय ? अजित पवारांच्या शिस्तीचा हा नमुना , म्हणूनच आता त्यांच्यासोबत काम करायचे तर ही शिस्त पाचवारी लागणार . अधिकाऱ्यांना देखील 'आताच काय ती तयारी करा, पुन्हा बैठक सुरु झाल्यावर अमुक माहिती नाही हे ऐकून घेणार नाही ' असले काही ऐकायची सवय नव्हती, त्यामुळे आता अजित पवारांच्या बैठका तरी गांभीर्याने होतील असे समजायला हरकत नाही. अजित पवारांच्या शिस्तीचा फटकारा मध्यमकर्मींवरही बसलाच. उगीच सकाळी उठल्यापासून एखाद्याच्या मागे लागण्यात काय अर्थ ? आलेल्या लोकांना किमान काही काम तरी करू द्यावे ? पण हे माध्यमांना सांगायचे कोणी ? ते काम देखील अजित पवारांनीच केले हे देखील एका अर्थाने बरेच झाले म्हणायचे. नाहीतरी बीडची जी अतिरंजित बदनामी झाली त्यामध्ये काही वाहिन्यांच्या अतिउत्साहाचा वाटा आहेच.
अजित पवारांनी आपल्या शिस्तीचे डोस कार्यकर्त्यांना देखील दिले आहेत. 'पाच दहा लाखाची कामे देणार नाही, मला कामाचा दर्जा पाहिजे . नियोजन समितीच्या प्रशासकीय मान्यता लवकरच देऊ, मी काम पाहणार आहे.ज्याचे ई टेंडरिंग होईल अशीच कामे देऊ ' या अजित पवारांच्या भूमिकेचे स्वागतच , पण बीडच्या मातीला अंगवळणी कसे पडणार ? नियोजन समितीचा निधी फक्त मार्च महिन्यातच खर्च करायचा असतो, कामाचे तुकडेच पाडायचे असतात , दर्जा बिर्जा म्हणजे कागदावर चांगला दिसतो याची जणू सवयच लागलेल्या इथल्या गुत्तेदार, अधिकाऱ्यांना आता अजित पवारांचा हा 'वेगळा ' कारभार पचविणे अवघड जाईल . पण सामाजिक सलोखा, बेरजेचे राजकारण , सर्व धर्म समभाव, आणि सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना विचारात घेणे हे सारे बीडसाठी तसे नवे आहे. इथल्या प्रत्येक घटकासाठी नवे आहे. ते आवश्यक आहे हे नक्कीच, पण ते पचविण्याची क्षमता अगोदर अजित पवारांना निर्माण करावी लागेल.

बातमी शेअर करा