Advertisement

संपादकीय अग्रलेख - आनंद आणि आव्हानं

प्रजापत्र | Sunday, 30/03/2025
बातमी शेअर करा

 आज मराठी नववर्षाची सुरुवात . गुढी पाडव्याचा दिवस, आजच्या दिवशी गुढी उभारली जाते, ती गुढी असते नवसंकल्पांची , इतिहासातील कर्तृत्वाला भविष्याची जोड देत, कडू गोड अनुभवांची सरमिसळ करून पुन्हा, वैशाख वणवा आयुष्यात येणार आहे हे माहित असतानाही चैत्र पालवी फुलवावी लागते हे सांगणारी गुढी म्हणजे खरेतर जीवनाचे तत्वज्ञान . हे तत्वज्ञान घेऊनच आपल्या 'प्रजापत्र 'ने मागच्या १२ वर्षात माध्यमातील खडतर प्रवास पूर्ण केला. माध्यमांच्या विश्वात 'प्रजापत्र'ला एक तप पूर्ण झालं. ही सारी तपश्चर्या ठरली असा दावा आम्ही करणार नाही, तसे काही म्हणणे म्हणजे स्वस्तुती ठरेल. हा प्रवास कसा होता, किंवा कसा झाला याचे मूल्यमापन सुज्ञ वाचक करतीलच. पण या साऱ्या प्रवासात , अगदी पहिल्या दिवसापासून जो विचार घेऊन चालायचे ठरविले होते, त्या मार्गाने चालत आले आणि समाजाच्या कामात कोठेतरी आपला सहभाग नोंदविता आला याचे समाधान निश्चितच आहे.
मागच्या १२ वर्षात अनेक सामाजिक स्थित्यंतरे झाली, ती माध्यमांच्या क्षेत्रात देखील झाली. समाजमाध्यमांचा अवकाश इतका वाढत गेला की इतर माध्यमांची जागा संपते की काय असे अनेकदा वाटून गेले, मात्र तरीही विश्वासार्हता या एकमेव पायावर आजही 'प्रजापत्र' उभे आहे. 'प्रजापत्र ' या बारा वर्षात धावता झाला आणि अनेकांना धावण्यास मदत करणारा देखील झाला. सामाजिक प्रश्नावर वेळ आली तेव्हा कठोर भूमिका घेण्यास जसे आम्ही कचरलो नाहीत, तसेच सकारात्मकतेने कौतुक करताना देखील कधी 'प्रजापत्र' ची लेखणी संकुचित झाली नाही.
महाराष्ट्राला ज्ञानोबा, तुकोबांचा वारसा आहे. त्यामुळेच संत ज्ञानेश्वरांनी जे 'जे खळांची व्यंकटी सांडो, त्या सत्कर्मी रती वाढो 'चे पसायदान मागितले, त्याला प्रमाण मानून व्यक्ती विरुद्ध नव्हे तर विकृती विरुद्ध आसूड ओढण्याचे काम प्रजापत्र ला करता आले. व्यक्ती नव्हे तर दुष्टावा संपावा अशीच आमची भूमिका राहिली आणि हे करण्यासाठी म्हणून मग संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे ' काय करू आता धरोनिया भीड, निःशंक हे  तोंड वाजविले , नव्हे कोणी जगी मुकीयांचा जाण, सार्थक लाजून नव्हे हित ' या धोरणातून 'प्रजापत्र ' चालत आला आहे.
१२ वर्ष पूर्ण करून करून १३ व्य वर्षात प्रवेश करीत असताना काही बदल देखील झाले. माध्यमातला वारसा देखील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीने घ्यायचा असतो. हे बदल नेहमीच प्रगतीसाठी पोषक ठरत असतात. तसे तर 'प्रजापत्र ' च्या पहिल्या दिवसापासून आपण सोबत आहोतच. पण या वर्षात जबाबदारी अधिक वाढली. आता संपादकाच्या भूमिकेतून आपल्यासमोर येत आहे. सारा परिवार जवळपास तोच आहे. सारे सह्कारती देखील तेच आहेत, त्यामुळे वाचकांशी जुळलेली वैचारिक नाळ बदलणार नाही. जुन्याच भूमिकेतून नवे विचार, नव्या संकल्पना आणि नवे संकल्प घेऊन चालत राहू. या साऱ्या प्रवासाला आपले बळ मिळत राहील हा विश्वास आहे. आजपर्यंतच्या प्रवासाचा आनंद आणि समाधान आहे. मात्र पुढच्या प्रवासात अनेक आव्हानही आहेत. माध्यमांच्या एकूणच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागत आहे, लावले जात आहे. शासनाची धोरणे देखील अनेकदा माध्यमांना अडचणीत आंतील अशी आहेत. 'नीर क्षीर विवेकाने ' काम करणे अवघड झाले असल्याची परिस्थिती आहे. मात्र आपल्या पाठबळावर ही आव्हाने 'प्रजापत्र' निश्चित पेलेल हा विश्वास आहे. आता मुद्रित प्रजापत्रसोबतच डिजिटल आणि दृक्श्राव्य (युट्युब ) माध्यमातून देखील आपला परिवार विस्तारत आहे. जबाबदाऱ्या आणि आव्हानं मोठी आहेत हे मान्य , पण आपण सारे एकत्रीयपणे, हातात घालून हा प्रवास करत राहू. या प्रवासात प्रजापत्र चे संपादकीय, वसायवस्थापकीय विभागातील सहकारी, कार्यालयीन सहकारी, सर्व प्रतिनिधी, वार्ताहर , वितरक, आणि वाचक या साऱ्यांचे योगदान आणि सक्रिय सहकार्य आहे आणि म्हणूनच इथपर्यंतचा प्रवास झाला आहे हे आज आवर्जून सांगावेच लागेल. आज आपण स्नेहमिलन कार्यक्रमाला सादर निमंत्रित आहेत . आमचा उत्साह वाढवून आम्हाला बळ देण्यासाठी आपण यायचंचय .
संजय मालाणी
संपादक . 

 

Advertisement

Advertisement