Advertisement

खोक्याच्या अडचणी वाढल्या,चौथा गुन्हा दाखल

प्रजापत्र | Thursday, 13/03/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.१३ (प्रतिनिधी): ढाकणे पिता-पुत्राला मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याला (दि.१२) बुधवार रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं अटक केली गेली. त्यानंतर आज खोक्याला बीडमध्ये आणण्यात येणार आहे. दरम्यान, त्याआधी त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. खोक्या भोसलेविरोधात वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

 शिरूर पोलीस ठाण्यात खोक्याविरोधात चार गुन्हे दाखल आहेत. त्यात नव्याने वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याचाही समावेश आहे. सतीश भोसले (खोक्या) राहत असेलल्या जागेचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठीही त्याला सात दिवसांची मुदत देण्यात आलीय.

खोक्याने एका व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटनं मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे इतर कारनामेही समोर आले होते. बॅटने मारहाण प्रकरणी पोलिसांनी स्वत: गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वन्यजीव प्राण्यांना लावलेल्या जाळीवरून ढाकणे पिता पुत्राला मारहाण केली होती. तर वनविभागाने टाकलेल्या छाप्यात गांजा सापडला होता. मारहाण आणि गांजा प्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले होते.

बुधवारी खोक्याविरोधात वन्यजीव विभागाकडूनही गुन्हा दाखल केला गेला. तो ज्या ठिकाणी राहतो ते अतिक्रमण असून मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी त्याला मुदत देण्यात आलीय. ७ दिवसात जर मालकी हक्क सिद्ध करता आला नाही तर वनविभागाकडून कारवाई अंतर्गत अतिक्रमण काढले जाऊ शकते.

 

Advertisement

Advertisement