Advertisement

पवनचक्की कंपन्यांना राजकीय व्यक्तींच्या नावाने धमक्या

प्रजापत्र | Friday, 07/03/2025
बातमी शेअर करा

बीड दि. ६ (प्रतिनिधी ) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर पवनऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला होता, आता केवळ एकाच पवनचक्की कंपनीला नव्हे तर बीड, धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पवनऊर्जा कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राजकीय व्यक्तींचे नाव घेऊन धमक्या दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पवनऊर्जा कंपन्यांच्या संघटनेने थेट केंद्रीय राज्यमंत्र्यांकडे दाद मागितल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणात लक्ष घातले असून पवनऊर्जा कंपन्यांना सुरक्षा तसेच त्रास देणारांवर कठोर कारवाई करण्यासाठी  बीड , धाराशिव आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.
बीड, धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या पवनऊर्जा निर्मितीचे प्रकल्प मोठ्याप्रमाणावर सुरु आहेत. यातील आवादा कंपनीला खंडणी मागितल्याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत असतानाच , हा प्रकार केवळ एका प्रकल्पपूर्त मर्यादित नसून बीड, धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्रकल्पाला काही समाजकंटकांकडून त्रास दिला जात असल्याचे पवनऊर्जा कंपन्यांच्या संघटनेने थेट या खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनाच कळविले आहे. पवन ऊर्जा कंपन्यांची संघटना असलेल्या 'विपा 'ने श्रीपाद नाईक यांना पत्र लिहून पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यात अडचणी येत असून या कंपन्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले आहे . तब्बल ४६ पवनऊर्जा कंपन्यांची संघटना असलेल्या 'विपा 'ने पत्र  खळबळ माजली असून या विषयात थेट दिल्लीहून सूत्रे हलली आहेत. 'विपा ' च्या पत्रानंतर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा आणि गृह खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कंपन्यांना त्रास देणारांचा 'बंदोबस्त' करण्याची विनंती केली आहे.
त्यानुसार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड, धाराशिव आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून पवनऊर्जा कंपन्यांच्या अडचणी दूर करण्यास सांगितले आहे. या कंपन्यांना त्रास देणारांवर कठोर कारवाईच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

 

संघटनेच्या पत्रात काय ?
पवनऊर्जा कंपन्यांची संघटना असलेल्या 'विपा ' च्या पत्रात बीड, धाराशिव आणि अहिल्यानगर भागात सुरु असलेल्या पवनऊर्जा प्रकल्पांचे उपकेंद्र कळंब येथे असल्याचे सांगितले असून वेगवेगळ्या पवनऊर्जा कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्थानिक पातळीवर काही लोक राजकीय पक्षाच्या प्रभावी लोकांची नावे घेऊन धमकावीत आहेत. या प्रकल्पाच्या ठिकाणी कंत्राटे मिळविण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. तांत्रिक ज्ञान नसताना देखील स्थानिक लोक कंत्राटे मागत असून त्यामुळे कंपनीच्या मनुष्यबळाच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे संघटनेने म्हटले आहे. तसेच कंपनीच्या वाहनांना जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याचे तसेच जमिनीच्या संदर्भाने तडजोडीला कोणी पुढाकार घेत नसल्याचे व प्रकल्पस्थळी साहित्याची चोरी होत असल्याचे  देखील पत्रात म्हटले आहे.

 

शेतकऱ्यांसाठी कोण येणार ?
पवनऊर्जा कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर ऊर्जा निर्माण होणार असून  गुंतवणूकदारांना सहकार्य झाले पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रामध्ये व्यक्त केली आहे. या भूमिकेचे स्वागत असले आणि कंत्राट मिळविण्यासाठीची धमक्या किंवा चोरी करणारांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे हे खरे असले तरी अनेक ठिकाणी कंपन्यांकडून देखील दादागिरी केली जाते, किंवा शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने मिळाव्यात असे अपेक्षिले जाते , अशावेळी शेतकऱ्यांचे म्हणणे कोण ऐकून घेणार आणि शेतकऱ्यांसाठी कोण धावून येणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

 

Advertisement

Advertisement