संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मागच्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मीडिया ट्रायलचा भाग झालेल्या मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अखेर राजीनामा दिला. खरेतर मागच्या काळात सातत्याने जे आरोप होत होते, त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंच्या आजच्या राजीनाम्याची देखील फारसे काही साधणारे नाहीच . त्यांना केवळ राजीनामा द्यायलाच नाही तर बऱ्याच गोष्टींना उशीरच झाला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. खरेतर या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडचे (Walmik Karad) नाव आले तेव्हापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंधच इतके जवळचे होते की या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होणे स्वाभाविक होते.
संतोष देशमुख(Santosh desmumh murder) हत्या प्रकरणात जे काही घडले ते संतापजनक आहेच. या प्रकरणाची जी छायाचित्रे समोर आली ती पाहिल्यावर कोणाचाही संताप अनावर होईल असेच ते सारे आहे. गावगुंडांची हिम्मत इतक्या पाशवी पातळीवर जाण्याची होते त्यामागे त्यांच्या मनात कोठेतरी आपण काहीही केले तरी आपले काहीच बिघडत नाही हा विश्वास होता, त्यांना हे बळ(Power) देणारे कोण होते ? मुळात त्यांनाच नाही तर राजकारणातच एकप्रकारची गुन्हेगारी वाढली आहे आणि गुंडापुंडांना जे बळ मिळत आहे त्या विकृतीचाच आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे . हा विचार धनंजय मुंडेंनी फार पूर्वी केला असता तर आज त्यांच्या राजकीय प्रवासाला हे ग्रहण लागले नसते.
मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्या राजीनाम्यामुळे आता त्यांच्या राजकीय प्रवासाला लागलेले ग्रहण इतक्या सहजासहजी सुटेल असे नाही. मुळात त्यांच्या राजीनाम्याची मागणी होण्यामागे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहेच, पण त्याही पलीकडे वाल्मिक कराडच्या माध्यमातून मागच्या काळात बीड जिल्ह्यात जे काही झाले त्याचा असलेला राग देखील आहे. आज प्रत्येकजण वाल्मिक कराडला या राजीनाम्याचे कारणठरवतोय ते खरेही आहे , पण हे सर्व लक्षात यायला देखील धनंजय मुंडेंना उशीर झाला का ?
राजकारणात ज्यावेळी नेता वर वर जात असतो, त्यावेळी खालची यंत्रणा सांभाळायला त्याला कोणावर तरी विसंबून राहावे लागत असते. त्यासाठी मग हे सर्व संभाळणारांना काही अधिकार द्यावे लागतात. तसेच अधिकार मंत्री धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडांना दिले, मात्र ज्यावेळी असे अधिकार दिले जातात , त्यावेळी त्या अधिकारांचा वापर कसा होत आहे हे पाहण्याची जबाबदारी अर्थातच अधिकार देणाऱ्या व्यक्तीची असते . वाल्मिक कराडच्या बाबतीत धनंजय मुंडेंनी ते पाहिले का ? हा फार मोठा प्रश्न आहे. परळीमध्ये किंवा बीड जिल्ह्यात वाल्मिक कराडच्या माध्यमातून काय होत आहे हे धनंजय मुंडेंना माहित नव्हते असे कसे म्हणता येईल , मग धनंजय मुंडेंनी या प्रवृत्तीला वेळीच का आवरले नाही ? जिल्ह्यातील छोट्या मोठ्या गोष्टीसाठी अगदी लोकप्रतिनिधींनाही कोणाला भेटावे लागते याची माहिती धनंजय मुंडेंना होती, किंबहुना ही यंत्रणा त्यांनीच निर्माण केली होती, मग ही व्यवस्था स्वैर होतेय हे पाहण्यात आणि समजण्यात देखील धनंजय मुंडेंना उशीर झाला का ? ज्यावेळी वाल्मिक कराडचे वाढते प्रस्थ धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांच्या अडचणी वाढवीत होते, त्यावेळी त्यात हस्तक्षेप करायला देखील मुंडेंना उशीर झाला का ? शिवराज बांगर सारख्या कार्यकर्त्यापासून पाटोद्याच्या बांगर कुटुंबापर्यंत सत्तेचा गैरवापर होत असताना धनंजय मुंडे मौन का राहिले ? आपल्या पायाखाली काय जळतंय हे लक्षात घेण्यात धनंजय मुंडेंना उशीर झाला का ? आपल्या कार्यालयातून जिल्ह्यातील आमदारांना देखील कोणत्या भाषेत फोन जातात हे धनंजय मुंडेंना माहित नव्हते का ? मग या साऱ्या परिस्थितीत धनंजय मुंडे 'नामानिराळे ' का राहत होते ? भगवानभक्तीगडावर ज्यावेळी 'ज्यांच्यशिवाय धनंजय मुंडेंचे पान देखील हलत नाही असे वाल्मिक कराड ' असा उल्लेख पंकजा मुंडे करीत होत्या, त्यावेळी हे अती होतेय हे धनंजय मुंडेंच्या लक्षात आले नाही का ?
धनंजय मुंडेंसारख्या राजकारण्याने या साऱ्या गोष्टी वेळेत समजून घेतल्या असत्या तर आज जी वेळ आली ती टाळता नक्कीच आली असती. धनंजय मुंडेंच्या लोकसभा निवडणुकीअगोदरच्या राजकारणावर कधी जातीयवादाचा शिक्का लागला नव्हता , उलट ते ज्या जातीचे प्रतिनिधित्व करतात , त्या समूहातून त्यांच्यावर दगड भिरकावले जात असताना इतर समाजघटकांनी त्यांना मायेचे पांघरून दिले होतेच. त्यांचा कार्यकर्ता वर्ग देखील सर्व समावेशक असा होता , मग असे सर्वसमावेशक व्यक्तिमत्व जातीच्या चौकटीत अडकविले जात आहे हे देखील समजून घ्यायला धनंजय मुंडेंना उशीर झाला. खरेतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यावेळी वाल्मिक कराडचे नाव आले, त्याचवेळी धनंजय मुंडे स्वतःहून आपल्या विवेकबुद्धीने मंत्रिपदापासून बाजूला झाले असते तर त्यांची राजकीय उंची नक्कीच आणखी वाढली असती. आता मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही त्यांचे व्हायचे ते नुकसान झाले आहेच, पण या साऱ्या प्रकारातून धनंजय मुंडेंनी आपण कोणत्या प्रवृत्तीला बळ द्यायचे आणि कोणाला किती स्वैर वागू द्यायचे याचा तरी धडा घ्यावा असे अपेक्षित आहे.