महामानवांच्या विचारांना तिलांजली देत त्यांना एकतर जातीच्या चौकटीत बांधायचे, त्यांना एकाच जातीच्या चश्म्यातून पाहायचे किंवा जातीय दर्पातून त्यांच्या इतिहासाची विकृत मांडणी करायची असले प्रकार मागच्या काळात महाराष्ट्रात वाढले आहेत . छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासून अगदी फुले दाम्पत्यापर्यंत अनेकांच्या बदनामीचे षडयंत्र जाणीवपूर्वक रचले जात आहे आणि अशा टवाळखोरांना जरब बसविण्यात सरकार नावाची यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे , त्यामुळे या षडयंत्रांना अधिकच बळ मिळत आहे. प्रशांत कोरटकर या व्यक्तीबद्दल बोलण्याचा हा विषय नाही तर महामानवांची बदनामी करणारी विकृती पुढच्या पिढ्यांसाठी घटक आहे.
इतिहास आणि इतिहासाची मांडणी हे विषय आता बऱ्यापैकी व्यक्तिसापेक्ष झालेले आहेत. इतिहासातील व्यक्तिरेखांबद्दल प्रत्येकाचे आकलन वेगळे असते , त्यामुळेच मागच्या काही काळात इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. विशेषतः बहुजनांच्या म्हणून ज्या काही अस्मिता आहेत अशा महामानवांच्या इतिहासात काहीही घुसडून त्यांच्या चरित्राला धक्का लावण्याचे प्रयत्न सातत्याने होत आलेले आहेत. जसजसे इतिहास संशोधन होत आले आणि विकृत इतिहासाला आव्हान देत वेगळ्या बाबी समोर आणण्यासाठी प्रयत्न होऊ लागले तसे इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या विकृतींचे पित्त खवलात गेले आणि मग अधून मधून अशा विकृती ऐतिहासिक महामानवांवर कोणत्या ना कोणत्या निमित्ताने, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून गरळ ओकत असतात.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी देताना कोना प्रशांत कोरटकर नामक इसमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने जे अनुद्गार काढले त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र खवळलेला आहे. आता तो आवाज माझा नाहीच, कोणीतरी एआय तंत्रज्ञानातून तयार केला आहे असे म्हणत त्या कोरटकरने 'तो मी नव्हेच ' असा पवित्र घेतलेला आहे. अर्थात असे काही होणे हे महाराष्ट्राला नवीन नाही. मुळात हा विषय कोणत्या एका व्यक्तीचा नाही , महाराष्ट्रात मागच्या काही दशकात ही जी विकृती फोफावली आहे त्याचा आहे. आज कोरटकर आहे, यापूर्वी कधी छिंदम कधी कोश्यारी , कधी सोलापूरकर असते अनेक उपटसुम्भ महामानवांची बदनामी करण्यासाठी पुढे आले होतेच. अगदी संवैधानिक उच्च पदावर बसलेल्या व्यक्तींकडून जर महामानवांची खिल्ली उडविली जात असेल तर हे विष किती पसरले आहे हे समजून घ्यावे लागते . मुळात ज्या काही म्हणून बहुजन अस्मिता आहेत, एकतर त्यांना बदनाम करायचे , नाही जमले तर त्यांना हायजॅक करायचे , कधी कधी त्यांना दैवत्व देऊन त्यांची सामान्यांशी असलेली नाळ तोडायची हे प्रकार महाराष्ट्राला नवे नाहीत, आता मात्र त्याचा अतिरेक होत आहे. एकतर वाचाल लोकांची संख्या वाढली आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी चाटवलेल्यांची संख्या वाढलेली आहे आणि त्याहून अधिक म्हणजे जातीय दर्प देखील वाढत चालला आहे. त्यातून असे प्रकार वाढत आहेत.
अशा नाठाळांना जर सत्तेने वेळीच कठोर शासन केले आणि अशा विकृती ठेवल्या तर विषवल्ली फोफावत नसते, मात्र ज्यावेळी सरकार नावाची यंत्रणा अशा विषवल्लींकडे कानाडोळा करते किंमहून अशा विषवल्लीसाठी कुंपण तयार करते त्यावेळी समाजाचे मोठे नुकसान होत असते. आज महाराष्ट्रात तेच सुरु आहे. महामानवांची बदनामी करणारे विषवल्ली , मग ती कोणतीही असो , उखडून फेकण्याची राजकीय सामाजिक इच्छाशक्ती दाखविण्याची आज आवश्यकता आहे.